पावसाचीही शक्यता

एकीकडे दमट राहणारी हवा, दुपारच्या वेळी अक्षरश: भाजून काढणारे कडक ऊन आणि रात्रीही जाणवणारा असह्य़ उकाडा यामुळे पुणेकर हैराण झाले आहेत. या आठवडय़ातही हवामान ढगाळच राहणार असून आठवडय़ाच्या सुरुवातीला पाऊस पडण्याच्या शक्यतेसह दिवसाचे तापमानही चढेच राहण्याचा वेधशाळेचा अंदाज आहे.

शनिवारपासून दिवसाचे तापमान आणि उकाडा अधिकच जाणवू लागला. दिवसभर घामाच्या धारा आणि रात्रीही गरम राहणारी हवा असे वातावरण रविवारीही राहिले. पुण्याचे कमाल तापमान रविवारी ४०.४ अंश सेल्सिअस होते, तर लोहगावला पारा ४१.७ अंशांवर गेला होता. शहर आणि परिसरात किमान तापमानही सरासरीपेक्षा अधिकच आहे.

वेधशाळेच्या अंदाजानुसार चालू आठवडादेखील पावसाळी हवामानाचा ठरण्याची शक्यता आहे. सोमवारी दुपारच्या वेळी गडगडाटी ढग तयार होण्याची शक्यता असून दिवसाचे तापमानही ४१ अंशांच्या जवळ राहू शकेल. मंगळवार आणि बुधवार दुपारनंतर आणि संध्याकाळी ढगांच्या गडगडाटासह पावसाची शक्यता आहे. गुरुवारीही काही भागात पाऊस पडू शकेल. बुधवारनंतर मात्र हवामान ढगाळ राहिले तरी कमाल तापमानात घट होण्याचा अंदाज आहे.