शिक्षण, सांस्कृतिक, क्रीडा अशा खात्यांचा कार्यभार सांभाळणारे मंत्री विनोद तावडे हे विविध कार्यक्रमांसाठी गुरुवारी पुण्यात आले होते. त्या वेळी कार्यक्रमांनंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. या वेळी दिलेल्या उत्तरांतून माध्यमाच्या प्रतिनिधींना ‘विनोद’ तावडे अनुभवायला मिळाले. स्थळ – अण्णा भाऊ साठे नाटय़गृह. कार्यक्रम – गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार वितरण

बालचित्रवाणीचे कर्मचारी वीस महिने वेतनाविना आहेत, त्यांचे वेतन कधी मिळणार?
– वेगवेगळ्या प्रकल्पातून संस्थेने आपल्या पायावर उभे राहावे. थोडय़ाच दिवसांत सारे काही सुरळीत होईल..

शिक्षण धोरणाच्या राज्याच्या आराखडय़ातील जातीय आरक्षण रद्द करण्याच्या तरतुदीवरून वाद झाला. आता ही तरतूद वगळण्यात आली आहे का?
– अनुसूचित जाती-जमातीमधील विद्यार्थ्यांना शालेय साहित्य देण्याबाबत तरतूद आहे. मात्र थेट आरक्षण शाळेतच नाही, तर ते रद्द कसे होणार? कुणीतरी आपल्या राजकीय स्वार्थापोटी काहीतरी माहिती सांगतात व त्याची बातमी होते.

बनावट मान्यता असलेल्या संस्थांबाबत काय कार्यवाही करणार?
– संस्था बनावट असताना त्यात प्रवेश घ्यायचा आणि नंतर मग सरकारकडे तक्रार कशाला करायची?

विद्यापीठ कायद्याचा मसुदा संकेतस्थळावर कधी टाकणार?
– मसुदा तयार करून संकेतस्थळावर टाकला की पुन्हा कुणीतरी नवा मुद्दा उपस्थित करेल. हा खेळ किती काळ खेळायचा? हिवाळी अधिवेशनातच मी यावर सविस्तर बोलेन.

पतंग उडविला तरी चालेल, पण शाळेच्या मैदानावर आठवडय़ातील चार दिवस द्या आणि क्रीडा गुण पदरात पाडून घ्या. – विनोद तावडे