पिंपरी-चिंचवडमध्ये संत तुकाराम नगर प्रभागात कमी दाबाने पाणी येत असल्याने चक्क भाजपाच्या महिला नगरसेविकेने टाकीवर चढून शोले स्टाईल आंदोलन केले आहे. सुजाता पालांडे असे या भाजपाच्या महिला नगरसेविकेचे नाव आहे. प्रभाग क्रमांक २० मध्ये गेली सहा दिवस कमी दाबाने पाणी येत आहे, तर कुठे पाणीच येत नसल्याची तक्रार त्यांच्याकडे नागरिकांनी केली होती. या प्रकरणी संबंधित अधिकाऱ्यांना सूचना दिल्या होत्या मात्र, त्यानी त्या गांभीर्याने न घेतल्याने त्यांना असे आंदोलन करावे लागले. विशेष म्हणजे पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेत भाजपाचीच सत्ता आहे. त्यामुळे त्यांनी हे आंदोलन सत्ताधारी भाजपाला घरचा अहेर दिला आहे.

पिंपरी-चिंचवड शहराला पाणीपुरवठा करणारे पवना धरण हे भरून वाहू लागले आहे. त्यामुळे आता शहरातील नागरिकांना नियमित पाणीपुरवठा करण्यात येत आहे. मात्र, दुसरीकडे शहरातील प्रभाग क्रमांक २० संत तुकाराम नगर, महात्मा फुले नगर या परिसरात गेल्या सहा दिवसांपासून कमी दाबाने पाणी येत आहे. तर काही ठिकाणी पाणीच येत नसल्याची तक्रार भाजपा नगरसेविका सुजाता पालांडे यांच्याकडे नागरिकांनी केली होती. या प्रकरणी त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना सूचना दिल्या होत्या. परंतु, त्याकडे सबंधित पाणीपुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केले.

अखेर सोमवारी साडेचार वाजता नगरसेविका पालांडे यांनी नेहरु नगर येथील पाण्याच्या टाकीवर जाऊन शोले स्टाईल आंदोलन केले. जो पर्यंत संबंधित अधिकाऱ्यांनी आश्वासने दिली नाहीत तोपर्यंत पालांडे यानी आंदोलन मागे घेतले नाही. अखेर संध्याकाळी साडेसात वाजता अधिकाऱ्यांनी आश्वासन दिल्यानंतर पालांडे यांनी आंदोलन मागे घेतले. दरम्यान, पिंपरी-चिंचवड महानगर पालिकेत भाजपाची सत्ता असून त्यांच्याच नगरसेविकेला पाण्यासाठी झगडावे लागत असल्याने त्यांनी केलेलं आंदोलन हे सत्ताधारी भाजपाला घराचा अहेर असल्याचे म्हटले जात आहे.