पिंपरी-चिंचवडकरांसाठी चांगली बातमी आहे. शहराला पाणीपुरवठा करणारे पवना धरण 90 टक्के भरले आहे. गेल्या 24 तासात धरण पाणलोट क्षेत्रात 8 मिलिमीटर पाऊस कोसळला असून 1 जूनपासून आतापर्यंत 1 हजार 408 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. यामुळे पिंपरी-चिंचवडकरांची किमान जवळपास पुढील वर्षभरासाठी तरी पाण्याची चिंता मिटली आहे. दरम्यान, अद्यापही शहरातील नागरिकांना दिवसाआड पाणी पुरवठा केला जात आहे.

पिंपरी-चिंचवडकर आणि मावळ परिसरातील काही गावांना पवना धरणातून पाणी पुरवठा केला जातो आहे. यावर्षी पाणलोट क्षेत्रात पावसाने उशिरा हजेरी लावली होती. मात्र, सतत कोसळणाऱ्या संततधार पावसाने धरणाच्या पाणी पातळीमध्ये वाढ होत गेली.  आता पवना धरणाच्या पाणीसाठ्यात 55.09 टक्के एवढी वाढ झाली असून आतापर्यंत 1 हजार 408 मिलिमीटर पाऊस कोसळला आहे.

दरम्यान, गेल्या वर्षी आजच्या तारखेला तब्बल 3 हजार 149 मिलिमीटर एवढा पाऊस कोसळला होता. शिवाय, पवना धरण हे तुडुंब भरले होते. परंतु, यावर्षी पावसाने उशिरा हजेरी लावली. पाऊस असाच सुरू राहिल्यास पवना धरण शंभर टक्के भरेल, पण सध्या तरी पिंपरी-चिंचवडकरांची जवळपास वर्षभरासाठी पाण्याची चिंता मिटली आहे.