पुणे, पिंपरी-चिंचवडमधील शाळांमध्ये पंचवीस टक्के राखीव जागांवरील प्रवेशासाठी मुदतवाढ देण्यात आली असून आता २० मेपर्यंत प्रवेश घेता येणार आहेत. सध्या साधारण साडेतीन हजार प्रवेश झाले आहेत.

शिक्षण हक्क कायद्यानुसार शाळांमध्ये वंचित आणि दुर्बल घटकांसाठी राखीव ठेवण्यात आलेल्या पंचवीस टक्के राखीव जागांवरील प्रवेश प्रक्रिया सुरू आहे. पहिल्या फेरीमध्ये शाळांमध्ये प्रवेश घेण्यासाठी शनिवार १४ मेपर्यंत मुदत देण्यात आली होती.

मात्र आता ही मुदत वाढवण्यात आली असून २० मेपर्यंत प्रवेश घेता येणार आहेत.

पहिल्या फेरीत ८ हजार २३१ विद्यार्थ्यांना शाळा देण्यात आल्या आहेत. त्यातील साधारण साडेतीन हजार विद्यार्थ्यांचाच प्रवेश शनिवारी सायंकाळपर्यंत निश्चित झाला आहे.

शाळांकडून प्रवेश नाकारण्यात येत असल्याच्या तक्रारी यावर्षीही पालकांकडून केल्या जात आहेत. शिक्षण विभागाकडून शुल्काचा परतावा मिळाला नसल्याचे सांगून पालकांकडे शुल्काची मागणीही शाळा करत आहेत.