राज्य शासनामार्फत प्लास्टिक बंदी कायद्याची अंमलबजावणी करताना चुकीची आणि बेकायदेशीर कारवाई करून व्यापाऱ्यांकडून दंड वसूल करण्यात येत आहे. याच्या निषेधार्थ आज पुणे शहर आणि उपनगरातील किरकोळ व्यापाऱ्यांनी एक दिवसाचा लाक्षणिक बंद पुकारला.या कारवाईच्या निषेधार्थ पुणे जिल्हा रिटेल व्यापारी वर्गाकडून पुणे महानगरपालिकेवर मोर्चा काढण्यात आला.

यावेळी व्यापारी संघटनेकडून सभागृह नेते श्रीनाथ भिमाले यांना सचिन निवंगुणे आणि सूर्यकांत पाठक यांनी कारवाई बाबत निवेदन दिले.
यावेळी पुणे जिल्हा रिटेल व्यापारी संघटनेचे सचिन निवगुणे म्हणाले की,राज्य शासनाकडून प्लास्टिक बंदीचा निर्णय लागू केला त्याचे आम्ही स्वागत करीत असून त्या आदेशानंतर पुणे महापालिकेमार्फत दुकानदारांकडून ज्या प्रकारे दंड वसूल केला जात आहे. यावर राज्य सरकारने तोडगा न काढल्यास आम्ही बेमुदत संपावर जाणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.