गणपती बाप्पा मोरया…पुढच्या वर्षी लवकर या, अशा जयघोषात आज सर्वत्र आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप दिला जात आहे. आज अनंत चतुर्दशीच्या दिवशी बाप्पाला निरोप देण्यात येत असून करोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे यंदाच्या वर्षीही गणेशभक्तांच्या आनंदावर विरजण पडलं आहे. गेल्यावर्षीप्रमाणेच यंदाही शांततेत आणि अनेक नियमांचं पालन करुन भक्तांना बाप्पाला निरोप द्यावा लागत आहे. दरम्यान पुण्यात मानाचा चौथा गणपती असणाऱ्या तुळशीबाग गणपतीचं ढोल-ताशा वादन सुरू असताना पोलिसांनी वादन करू नये यासाठी त्यांच्याजवळील साहित्य काढून घेतलं होतं. यावेळी पोलीस आणि कार्यकर्त्यांमध्ये काहीसा वाद झाला. अखेर पोलीस आणि कार्यकर्त्यांमध्ये चर्चा झाल्यावर साहित्य परत देण्यात आले.

नेमकं काय झालं –

पुण्यातील मानाच्या पाच गणपतींचं यंदा उत्सव मंडपासमोरच विसर्जन केलं जात आहे. सकाळी ११ वाजता कसबा गणपतीसह मानाच्या इतर चारही गणपतीचं विसर्जन केलं जाणार होतं. मात्र करोनाच्या पार्श्वभूमीवर नियमावली जाहीर करण्यात आली होती. यावेळी तुळशीबाग गणपतीच्या विसर्जनात ढोल-ताशे वाजवले जात असताना पोलीस तिथे पोहोचले आणि ढोल-ताशे वाजवणाऱ्यांचं साहित्य जप्त केलं. यानंतर तिथे थोडी गोंधळाची स्थिती निर्माण झाली. पोलिसांनी परवानगी नसतानाही वादन केले जात असल्याने कारवाई केल्यानंतर गोंधळ उडाला.

दरम्यान तुळशीबाग गणपती मंडळाने पोलिसांनी कारवाई केली नसून फक्त समज दिली असल्याचं म्हटलं आहे. “आमच्यावर पोलिसांनी कारवाई केलेली नाही. पोलिसांनी समज दिलेली आहे,” अशी माहिती मंडळाचे खजिनदार नितीन पंडित यांनी दिली आहे. पोलिसांनी काही वेळाने जप्त केलेलं साहित्य परत केलं. यानंतर शांततेत मिरवणूक काढत गणपतीचं विसर्जन करण्यात आलं.

गणेश विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर आज पुणे शहरातली सर्व दुकानं बंद ठेवण्यात आली आहेत. तसंच पुणे शहरात आज सात हजार पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.