भोसरी पोलिसांची कारवाई, ११ दुचाकी गाड्या केल्या जप्त

केवळ मौज मजेसाठी दुचाकी चोरणाऱ्या सराईत चोरट्यांना भोसरी पोलिसांनी अटक केली आहे. भोसरी पोलीस ठाणे आणि पुणे शहर पोलिसांच्या हद्दीत या चोरट्याने धुमाकूळ घातला होता. गणेश राजकुमार होनराव (वय २७,रा. सुनील नगर मोशी टोलनाक्या जवळ) आणि स्वप्नील बबन रोकडे(वय १८, रा. शिवजीवाडी मोशी ) अशी अटक केलेल्या चोरट्यांनी नाव आहेत. या दोघांनी भोसरी, विमाननगर, विश्रामबाग आणि पुणे ग्रामीण हद्दीत नागरिकांच्या अक्षरशः नाकी नऊ आणले होते.  हे दोघे मोकळ्या जागेत किंवा बिल्डिंगच्या खाली पार्किंग केलेल्या ठिकाणाहून दुचाकी वाहन चोरायचे आणि आपल्या ओळखीच्या जागी दुचाकी पार्क करायचे. विशेष म्हणजे हे केवळ मौज मजेसाठी वाहन चोरायचे, अशी माहिती पोलीस निरीक्षक अजय भोसले यांनी दिली.

गणेश होनराव याच्याकडे चोरीची दुचाकी असल्याची माहिती भोसरी पोलिसांना खबऱ्यामार्फत मिळाली होती. त्यानुसार त्याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता, त्याचा साथीदार स्वप्नील रोकडे याच्याकडे सहा दुचाकी गाड्या, गणेश होनराव याच्या घराच्यामागे एक तसेच भोसरी मधील लांडेवाडी येथे तीन दुचाकी गाड्या मिळाल्या आहेत. अशा एकूण ११ दुचाकी गाड्या दोघांकडून जप्त केल्या आहेत..या दोघांना ३० डिसेंबरला अटक केली असून कलम ३७९ नुसार त्यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे,त्यांना तीन दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती. त्यानंतर आज या आरोपींना पुन्हा ३ दिवसांची परत पोलीस कोठडी सुनावण्यात आली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिलीप कुलकर्णी आणि पोलीस निक्षक(गुन्हे) अजय भोसले ,यांच्या मार्गदर्शना खाली ही कारवाई करण्यात आली.