पिंपरी-चिंचवडमध्ये परराज्यातून विमानाने येऊन पंचतारांकित हॉटेलमध्ये राहून घरफोड्या करणाऱ्या सराईत गुन्हेगाराला वाकड पोलिसांनी जेरबंद केले आहे. पोलिसांनी त्याच्याकडून आठ लाख रुपयांचे २५ तोळे सोन्याचे दागिने आणि लॅपटॉप असा ऐवज जप्त केला आहे. अनिल राजभर (३६) असे या आरोपीचे नाव आहे. उत्तर प्रदेशमधून त्याला अटक करण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जुलै महिन्यात दोन दिवसात थेरगाव आणि वाकड येथे घरफोडी करण्यात आली होती. यावेळी एकूण २५ तोळे सोन्याचे दागिने आणि लॅपटॉप चोरण्यात आले होते. याप्रकरणी वाकड पोलिसांत गुन्हा दाखल झाला होता. महत्त्वाचं म्हणजे, आरोपी हा विमानाने येऊन पंचतारांकित हॉटेलमध्ये राहून त्या दरम्यान परिसरातील भागात रेकी करून दिवसा घरफोड्या करायचा.

आरोपीचा शोध घेण्यासाठी वाकड पोलिसांनी तीन पथके तयार केली होती. त्यानुसार संशयित आरोपींचा शोध सुरू करण्यात आला होता. यावेळी एक व्यक्ती संशयास्पद हालचाली करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी तपास करत आरोपी अनिलला उत्तर प्रदेशमधून अटक केली.

त्याच्याकडे सखोल चौकशी केली असता शहरातील दोन्ही घरफोड्या केल्याची कबुली दिली. त्याच्यावर मुंबई आणि पुण्यातील शिवाजी नगर येथे घरफोडीचे गुन्हे दाखल आहेत अशी माहिती वाकड पोलिसांनी दिली. सदर कामगिरी ही वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतीश माने यांच्या मार्गदर्शनाखाली हरीश माने यांच्या पथकाने केली आहे.