पुणे : भारतीय नौसेनेचा गणवेश परिधान करून फिरणाऱ्या एकाला चतु:शृंगी पोलिसांनी गुरुवारी सायंकाळी पकडले. त्याच्याकडून नौसेनेचे बनावट ओळखपत्र जप्त केले.

या प्रकरणी राजन जनार्दन शर्मा (वय २३, रा. सिद्धार्थनगर, औंध, मूळ  रा. माधवनगर, पश्चिम बंगाल) याला अटक करण्यात आली. पोलीस नाईक दादासाहेब काळे यांनी या संदर्भात चतु:शृंगी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. शर्मा नौसैनिकासारखा गणवेश परिधान करून औंध भागात फिरत असल्याची माहिती सहायक पोलीस निरीक्षक संदेश केंजळे यांना मिळाली. राज्य दहशतवाद विरोधी पथक तसेच चतु:शृंगी पोलिसांच्या पथकाने औंधमधील सिद्धार्थनगर भागात शर्माचा शोध घेण्यास सुरुवात केली. पोलिसांनी तेथे सापळा लावला. तेव्हा तो दुचाकीवरून नौसैनिकाप्रमाणे गणवेश परिधान करून निघाला होता. पोलिसांनी त्याला अडवले आणि चौकशी सुरू केली. त्याची झडती घेण्यात आली तेव्हा त्याच्याकडे नौसेनेचे बनावट ओळखपत्र सापडले.  शर्माला ताब्यात घेण्यात आले. रात्री उशिरा त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. सहायक निरीक्षक केंजळे, उपनिरीक्षक प्रेम वाघमोरे, सारस साळवी, महेश बामगुडे, मुळे यांनी ही कारवाई केली.

शर्माची चौकशी सुरू

नौसैनिकासारखा गणवेश परिधान करणाऱ्या राजन शर्माने लष्करी संस्थांची पाहणी करून गोपनीय माहिती मिळविली आहे का, यादृष्टीने तपास सुरू आहे. यापूर्वी त्याच्याविरुद्ध हिंजवडी पोलीस ठाण्यात माहिती-तंत्रज्ञान कायद्यांतर्गत गुन्हा दाखल झाला होता.