पाचशे रुपयांच्या बनावट नोटा चलनात आणणारा एक अटकेत

पुणे : पाचशे रुपयांच्या बनावट नोटा चलनात आणण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी सहकारनगर पोलिसांकडून एकाला अटक  करण्यात आली आहे. एसटी बसमध्ये विसरलेल्या पिशवीत पाचशे रुपयांच्या बनावट नोटा सापडल्यानंतर पोलिसांकडून या प्रकरणाचा तपास सुरू करण्यात आला होता.

या प्रकरणी अविनाश  संभाजी चव्हाण (वय ३०, रा. डोंगरसोनी, ता. तासगांव, जि. सांगली) याला अटक करण्यात आली आहे. त्याचा साथीदार प्रवीण रामचंद्र शिंदे (वय ३०, रा. बुलगवडे, ता. तासगाव, जि. सांगली) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहायक पोलीस निरीक्षक चेतन मोरे यांनी या संदर्भात सहकारनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विशाल रंगनाथ माळवे (वय ४१, सध्या रा. धनकवडी) हे मूळचे सांगलीतील वाळवा तालुक्यातील आहेत. कामानिमित्त ते गावाकडे गेले होते. २४ फेब्रुवारी रोजी ते मिरज-राजगुरुनगर या मार्गावरील बसमधून प्रवास करत होते. एसटी पुण्यात आल्यानंतर एका आसनावर पिशवी विसरल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यांनी पिशवीची पाहणी केली. तेव्हा पिशवीत पाकीट सापडले. त्यात सापडलेल्या कागदपत्रांद्वारे पिशवी अविनाश चव्हाण याची असल्याचे निदर्शनास आले. चव्हाण यांचा संपर्क क्रमांक न मिळाल्याने माळवे पिशवी घरी घेऊन गेले. पिशवीची पाहणी केली. तेव्हा पिशवीत पाचशे रुपयांच्या ४६ बनावट नोटा आढळल्या.  माळवे यांनी सहकारनगर पोलीस ठाण्यात पिशवी दिली. सहकारनगर पोलिसांकडून या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता.

पिशवीत आधारकार्ड, मतदार ओळखपत्र सापडले. पोलिसांचे पथक आरोपी अविनाश चव्हाण याच्या गावी गेले. तेव्हा तो नोकरीनिमित्त ठाण्यात स्थायिक झाल्याची माहिती मिळाली. दरम्यान, ११ मे रोजी आरोपी चव्हाण गावात येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलीस शिपाई इंगळे आणि येवले यांनी चव्हाणला ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान चव्हाण याने बनावट नोटा प्रवीण शिंदे याच्या असल्याची माहिती दिली. चव्हाण याने बनावट नोटा पिशवीत ठेवल्या होत्या. सांगली येथून ठाण्याला जाण्यासाठी एसटीने पुण्यात आलो. प्रवासादरम्यान, पिशवी विसरल्याचे त्याने सांगितले. बनावट नोटा प्रक रणी पोलिसांकडून आरोपी शिंदे याचा शोध घेण्यात येत आहे. पाचशे रुपयांच्या नोटा प्रिंटरवर तयार केल्याचे उघडकीस  आले असून पोलीस उपनिरीक्षक बी. आर. बडे तपास करत आहेत.