राहुल खळदकर rahul.khaladkar@expressindia.com

ज्येष्ठ नागरिकांना मदत करण्याचा बहाणा करून हातचलाखीने डेबिट कार्ड चोरून त्याद्वारे खात्यातून पैसे काढण्याच्या घटना एटीएम केंद्रात पैसे काढण्यासाठी जाणारे ज्येष्ठ नागरिक चोरटय़ांचे लक्ष्य ठरतात. अनेकांना एटीएम यंत्रातून पैसे काढणे जमत नाही. अशा ज्येष्ठ नागरिकांना मदत करण्याचा बहाणा करून हातचलाखीने डेबिट कार्ड चोरून त्याद्वारे खात्यातून पैसे काढण्याच्या घटना ऐकिवात येतात. एटीएम केंद्राबाहेर थांबलेले चोरटे त्यांचे सावज शोधत असतात. खडकी भागात देखील ज्येष्ठ नागरिकांना मदत करण्याचा बहाणा करून ज्येष्ठ नागरिकांची फसवणूक करणाऱ्या चोरटय़ाला पोलिसांनी नुकतेच पकडले.

गेल्या काही दिवसांपासून खडकी भागात असलेल्या विविध बँकांच्या एटीएम केंद्रात पैसे काढण्यासाठी जाणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांना मदत करण्याचा बहाणा करून त्यांच्याकडील पैसे लांबविण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली होती. खडकी पोलिसांकडे याबाबत तक्रार करण्यात आली होती. एटीएम केंद्रात पैसे काढण्यासाठी जाणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांना गंडा घालणाऱ्या चोरटय़ाचा पोलिसांकडून माग काढण्यात येत होता. दरम्यान, पोलिसांना खडकी बाजार परिसरातील एका एटीएम केंद्रातून चित्रीकरण उपलब्ध झाले होते. एटीएम केंद्राबाहेर एक व्यक्ती गेल्या काही दिवसांपासून संशयास्पद वावरत असल्याची माहिती खडकी पोलीस ठाण्यातील पोलीस नाईक किरण घुटे यांना मिळाली. पोलिसांनी सापळा लावून अय्याज कासम शेख (वय ३३, रा.स्वप्ननगरी सोसायटी, चिखली) याला ताब्यात घेतले. चौकशीत त्याने ज्येष्ठ नागरिकांची फसवणूक केल्याची कबुली दिली, अशी माहिती खडकी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र मोहिते यांनी दिली.

शेखने ज्येष्ठ नागरिकांची फसवणूक कशी केली. याबाबतची माहिती देताना पोलीस निरीक्षक मोहिते म्हणाले, खडकी बाजार गजबजलेला भाग आहे. तेथे मोठे संख्येने नागरिक खरेदीसाठी येतात. या भागातील एका एटीएम केंद्राबाहेर शेख थांबायचा. एटीएम केंद्रात जाणाऱ्या व्यक्तींवर तो पाळत ठेवायचा. एटीएम केंद्रात ज्येष्ठ नागरिक गेल्यानंतर त्यांच्या पाठोपाठ शेख जायचा. खडकी बाजार भागातील एटीएम केंद्रात दोन एटीएम यंत्रे आहेत. ज्येष्ठ नागरिकांवर पाळत ठेवून एटीएम केंद्रात शिरलेला शेख ज्येष्ठ नागरिकाशी काही तरी निमित्त काढून बोलायचा. शेखचे शिक्षण बऱ्यापैकी झाल्याने त्याचे संभाषण कौशल्य चांगले आहे. अनेक ज्येष्ठ नागरिकांना एटीएम यंत्रातून पैसे काढता येत नाहीत. काही ज्येष्ठ नागरिक थोडेसे गोंधळतात. त्यांच्या चेहऱ्यावरील भाव टिपून शेख लगोलग मदत करण्याचा बहाणा करायचा.

शेख एटीएम केंद्रातील दुसऱ्या यंत्रात कार्ड टाकायचा. दरम्यान, पैसै काढणाऱ्या ज्येष्ठ नागरिकाकडे बतावणी करायचा. तुम्ही पैसे काढण्यासाठी वापरत असलेल्या एटीएम यंत्रात बिघाड झाला असल्याची शक्यता आहे, असे सांगून त्यांच्याकडील कार्ड घ्यायचा. मदतीचा बहाणा केल्यामुळे ज्येष्ठ नागरिक त्याच्यावर विश्वास ठेवायचे. शेख त्यांच्याकडून कार्ड घ्यायचा. किती पैसे काढायचे असे विचारून त्यांना पैसे काढून द्यायचा. दरम्यान, ज्येष्ठ नागरिकाने एटीएम यंत्रातून काढलेला सांकेतिक शब्द तो लक्षात ठेवायचा. पैसे काढून झाल्यानंतर शेख त्याच्याकडील कार्ड ज्येष्ठ नागरिकाकडे द्यायचा. त्यानंतर हातचलाखी करून काही सेकंदात शेख ज्येष्ठ नागरिकाच्या डेबिट कार्डचा वापर करून खात्यातून पैसे काढायचा.

हे कार्ड स्वत:चे असल्याचा भासवायचा आणि हातचलाखी करून तो पुन्हा ज्येष्ठ नागरिकाला दिलेले स्वत:चे कार्ड ताब्यात घ्यायचा. दरम्यान, ज्येष्ठ नागरिकाच्या खात्यातून जास्त रक्कम लांबविण्यात यायची. तो पर्यंत शेख एटीएम केंद्रातून पसार व्हायचा. अशा प्रकारच्या तक्रारींमध्ये वाढ झाल्यानंतर पोलिसांनी चोरटय़ाचा शोध घेण्यास सुरुवात केली होती. दरम्यान, खडकी बाजारातील एका व्यावसायिकाने एटीएम केंद्राबाहेर थांबणाऱ्या संशयास्पद व्यक्तीची माहिती पोलिसांना दिली होती. एटीएम केंद्राच्या परिसरातील सीसीटीव्ही चित्रीकरण तसेच पोलिसांना मिळालेले संशयिताचे वर्णन याद्वारे पोलिसांनी खडकी भागातील विविध एटीएम केंद्राबाहेर साध्या वेशात पाळत ठेवली होती. शेखला एटीएम केंद्राच्या बाहेरून ताब्यात घेण्यात आले. तेव्हा त्याने ज्येष्ठ नागरिकांची फसवणूक केल्याची कबुली दिली. त्याने नेमके किती गुन्हे केले, याबाबतची माहिती घेण्याचे काम सुरू आहे, असे पोलीस निरीक्षक मोहिते यांनी सांगितले.

शेखची कौटुंबिक परिस्थिती तशी चांगली आहे. बेताचे शिक्षण झाल्यानंतर त्याने काही काळ खासगी ठिकाणी नोकरी केली. नोकरी सुटल्यानंतर त्याने फसवणुकीचे गुन्हे करण्यास सुरुवात केली. पोलीस उपायुक्त प्रसाद अक्कानवरू, सहायक आयुक्त कल्याणराव विधाते यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र मोहिते, उपनिरीक्षक मदन कांबळे, किरण घुटे, संदीप गायकवाड, सुरेश गेंगजे, ठोकळ, गणेश लोखंडे, राजकि रण पवार, विशाल मेमाणे, अनिरुद्ध सोनवणे, हेमंत माने आदींनी या गुन्ह्य़ाचा तपास केला.