ग्रामीण आणि शहरी भागातून दुचाकी चोरणाऱ्या टोळीला वाहन चोरी पथक आणि गुन्हे शाखा युनिट तीनने अटक केली आहे. त्यांच्याकडून १० लाख ३० हजार रुपयांच्या ऐकून १८ दुचाकी आणि एक टेम्पो हस्तगत करण्यात आला आहे. १२ वाहन चोरीचे आणि दोन एटीएम फोडलेले गुन्हे उघड झाले आहेत. प्रवीण गोरक्षनाथ गाडे (२६), नितीन मच्छीन्द्र नेहे (२३), निखिल बाळासाहेब गाडे (२४), हरीश लक्ष्मण गाडे (२५) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ग्रामीण भागातील खेड, सिन्नर, मंचर, आळेफाटा, संगमनेर तर पिंपरी-चिंचवड शहरातील निगडी, हिंजवडी, चिखली परिसरात दुचाकी चोरांच्या टोळीने हैदोस घातला होता. त्याचसोबतच खालूब्रे आणि खेड येथे एटीएम मशीन फोडून पैसे लुटण्याचा प्रयत्न झाला होता. या सर्व गुन्ह्यात सदर टोळीतील आरोपी पोलिसांना हवे होते. त्यानुसार सहाय्यक पोलीस निरीक्षक सतीश कांबळे यांचे पथक गस्त घालत असताना पथकातील पोलीस कर्मचारी सचिन उगले आणि विनोद साळवी यांना बातमीदारामार्फत दुचाकी टोळीतील हवे असलेले तीन इसम हे चाकण परिसरातील महेंद्रा कंपनी शेजारी येणार असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली.

त्यानुसार वरिष्ठ पोलीस निरीक्षक भानुदास जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली एक पथक तयार करण्यात आले. संबंधित ठिकाणी पोलीस पथक दबा धरून बसले, तीन अज्ञात इसम हे दुचाकी वरून आल्यानंतर त्यांना पकडले. त्यांच्याकडे अधिक चौकशी केली असता अन्य एका साथीदारांसह ग्रामीण आणि शहरी भागात दुचाकी चोरी करत असल्याची कबुली दिली आहे.

दरम्यान, यातील पोलीस कर्मचारी सचिन उगले यांनी कर्तव्य बजावत असताना आत्तापर्यंत पाचशेपेक्षा जास्त दुचाकी पकडून दिल्या आहेत. सदरची कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक भानुदास जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक सतीश कांबळे, पोलीस उपनिरीक्षक गिरीश चामले, पोलीस कर्मचारी सचिन उगले, रमेश गायकवाड, जमीर तांबोळी, राजकुमार हणमंते, अरुण नरळे, सचिन मोरे, राहुल खारगे, त्रिनयन बाळसराफ, विनोद साळवे यांनी केली आहे.