पोलीस आयुक्तांचा इशारा; गैरप्रकार रोखण्यासाठी विशेष पथके

पुणे : होळी तसेच धुळवडीचा आनंद लुटणाऱ्या तरुणाईकडून होणारे गैरप्रकार रोखण्यासाठी पोलिसांकडून शहरात बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे. शहरातील महत्त्वाचे रस्ते तसेच प्रमुख चौकांत बंदोबस्त नेमण्यात येणार आहे. गैरप्रकार करणारे तसेच मद्यधुंद अवस्थेत दुचाकी चालविणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात येणार आहे. पादचाऱ्यांच्या अंगावर फुगे फेकणारे तसेच हुल्लडबाजी करणाऱ्यांविरोधात कडक कारवाई करण्याचा इशारा पोलीस आयुक्त डॉ. के. वेंकटेशम यांनी मंगळवारी दिला.

धुळवडीच्या दिवशी अनेक जण मद्य पिऊन वाहने चालवितात. त्यामुळे गंभीर स्वरूपाचे अपघात घडतात. गंभीर स्वरूपाचे अपघात तसेच गैरप्रकार रोखण्यासाठी वाहतूक पोलीस तसेच गुन्हे शाखेला सूचना देण्यात आल्या आहेत. नियमभंग करणाऱ्यांविरोधात कडक कारवाई करण्यात येणार आहे. शहरातील सर्व पोलीस ठाण्यांच्या प्रमुखांना सूचना देण्यात आल्या आहेत. मंगळवारी बंदोबस्ताच्या अनुषंगाने झालेल्या बैठकीत सर्व पोलीस ठाण्यांच्या प्रमुखांना गैरप्रकार करणाऱ्यांविरोधात कारवाई करण्याचा सूचना देण्यात आल्या आहेत,अशी माहिती पोलीस आयुक्त वेंकटेशम यांनी दिली.

शहरातील महत्त्वाचे चौक तसेच प्रमुख रस्त्यांवर बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. मद्यपी वाहनचालकांवर कारवाई करण्यात येणार आहे. होळी आणि धुळवडीच्या दिवशी शहरात गस्त वाढविण्यात येणार आहे.

गैरप्रकार करणाऱ्यांविरोधात मुंबई पोलीस कायद्याअंतर्गत कारवाई करण्यात येणार आहे. गंभीर स्वरूपाचा गुन्हा केल्यास त्वरित कारवाई करून अटक करण्यात येईल, असे वेंकटेशम यांनी स्पष्ट केले.

होळी जरूर साजरी करा. मात्र, मद्य पिऊन वाहने चालवू नका तसेच कायदा-सुव्यवस्थेला बाधा आणणारे कृत्य करू नका, असे आवाहन त्यांनी केले.

रेल्वेगाडीवर फुगे फेकणाऱ्यांवर कारवाई

रेल्वेगाडीवर फुगे फेकणारे तसेच गैरप्रकार करणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी लोहमार्ग पोलिसांकडून गस्त घालण्यात येणार आहे. रेल्वेगाडीतील प्रवासी तसेच युवतींच्या दिशेने लोहमार्गालगतच्या झोपडपट्टय़ांमधून फुगे फेकण्यात येतात. शिवाजीनगर ते लोणावळा दरम्यान अशा प्रकारच्या घटना घडतात. त्यामुळे लोहमार्गालगतच्या भागावर तसेच गैरप्रकार करणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी विशेष पथक तयार करण्यात आले आहे, असे लोहमार्ग पोलिसांच्या पुणे विभागाचे पोलीस अधीक्षक दीपक साकोरे यांनी सांगितले.

धुळवडीच्या दिवशी रंगपंचमी

होळी बुधवारी (२० मार्च) असून गुरुवारी (२१ मार्च) धुळवड आहे. गेल्या काही वर्षांपासून शहरात धुळवडीच्या दिवशी मोठय़ा प्रमाणावर रंग खेळला जात आहे. रंग खेळणाऱ्यांकडून गैरप्रकार केले जातात. शहरात मोठय़ा संख्येने परराज्यातील विद्यार्थी तसेच नोकरदार वास्तव्यास आहेत. त्यामुळे धुळवडीच्या दिवशी रंग खेळण्याचे प्रमाण वाढत चालले आहे. होळी आणि धुळवडीच्या दिवशी रंग खेळला जातो. मात्र, पुणेकर रंगपंचमीच्या दिवशी रंग खेळतात.

पोलीस आयुक्तांनी दिलेल्या सूचनेनुसार शहरातील प्रमुख चौक तसेच रस्त्यांवर वाहतूक शाखा तसेच गुन्हे शाखेकडून नाकाबंदी करण्यात येणार आहे. पोलीस ठाण्यांतील कर्मचाऱ्यांबरोबरच गुन्हे शाखेतील पथके साध्या वेशात गस्त घालणार आहेत. गैरप्रकार करणारे तसेच सामान्यांना त्रास होईल, असे वर्तन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

– शिरीष सरदेशपांडे, पोलीस उपायुक्त, गुन्हे शाखा