शहरातील सर्व अवैध धंदे बंद करण्याचे आदेश नवनियुक्त पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला यांनी दिल्यानंतर अवैध धंदे करणारे भूमिगत झाले आहेत. एवढेच नव्हे, तर या आदेशामुळे पोलीस दलातील अनेक अधिकारीही नाराज झाले आहेत. पोलीस आयुक्तांच्या आदेशामुळे सुरू असलेल्या अवैध धंद्यांवर कारवाई झाली. त्यामुळे उघडपणे चालणारे अवैध धंदे आता काही ठिकाणी छुप्या पद्धतीने सुरू झाले आहेत.
रश्मी शुक्ला यांनी पोलीस आयुक्तपदाची सूत्रे ३१ मार्च रोजी स्वीकारली. त्यानंतर दीर्घकालीन रजेवर गेलेले सहपोलीस आयुक्त सुनील रामानंद रुजू झाले. पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरातील सर्व पोलीस ठाण्यांच्या वरिष्ठ निरीक्षकांसह पोलीस उपायुक्त आणि सहायक आयुक्तांबरोबर झालेल्या पहिल्याच गुन्हेविषयक आढावा बैठकीत पोलीस आयुक्तांनी तातडीने अवैध धंदे बंद करण्याचे आदेश दिले. ज्या पोलीस ठाण्यांच्या हद्दीत अवैध धंदे सुरू आहेत अशा पोलीस ठाण्यांच्या वरिष्ठ निरीक्षकांवर कारवाई करण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे. सहपोलीस आयुक्त रामानंद यांनी काही दिवसांपूर्वी स्वत: चा मोबाईल क्रमांक शहरातील विविध पोलीस ठाण्यांमधील सूचना फलकांवर लावण्याचे आदेश देऊन अवैध धंद्यांची माहिती कळविण्याचे आवाहन नागरिकांना केले होते.
पोलीस आयुक्त शुक्ला आणि सहआयुक्त रामानंद यांनी, गैरप्रकार आणि अवैध धंदे खपवून घेण्यात येणार नाहीत, असा इशारा दिल्याने पोलीस दलातील अनेक अधिकारीही अडचणीत आले आहेत. पोलीस आयुक्तांच्या आदेशानंतरही कोरेगाव पार्कमधील उच्चभ्रू सोसायटय़ांमध्ये वेश्याव्यवसाय उघड झाला. विशेष शाखेच्या पथकाने तेथे छापा टाकून पाच दलालांना अटक करुन त्यांच्या तावडीतून एका अल्पवयीन मुलीसह सहा तरुणींची सुटका केली होती. त्या पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ निरीक्षकावर कारवाई होण्याचे संकेत देण्यात आले आहेत. लवकरच संबंधित अधिकाऱ्याची बदली पोलीस नियंत्रण कक्षात होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
शहरात अनेक ठिकाणी मटका, पत्त्यांच्या नावाखाली जुगाराचे अड्डे चालू आहेत. सध्या शहरातील अवैध धंदे आणि त्यांचे चालक भूमिगत झाले आहेत. काही ठिकाणी छुप्या पद्धतीने अवैध धंदे सुरू आहेत. लॉटरीच्या नावाखाली मटका खेळला जात आहे. शहराच्या मध्यवस्तीतील अनेक लॉटरी व्यावसायिक अशा पद्धतीचा व्यवसाय करत आहेत. पोलीस आयुक्तांच्या आदेशानंतर अवैध धंदे काहीसे थंडावले असले तरी अशा व्यावसायिकांनी छुप्या पद्धतीने त्यांचे व्यवसाय सुरू केले आहेत.

तर नियंत्रण कक्षात बदली
जोपर्यंत पुणे शहरात पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला आणि सहआयुक्त सुनील रामानंद आहेत, तोपर्यंत अवैध धंदे सुरु होणार नाहीत, हे स्पष्ट झाले आहे. या दोन्ही अधिकाऱ्यांनी तशी कृतियोजना आखली आहे. शुक्ला आणि रामानंद हे दोघेजण प्रामाणिक आणि सचोटीचे अधिकारी म्हणून ओळखले जातात. शिस्तीच्या भोक्त्या असलेल्या शुक्ला या अवैध धंदे करणाऱ्यांची खैर करणार नाहीत. धंदे बंद करण्याची कारवाई सुरू झाल्यामुळे चोरीछुपे धंदे सुरू राहणार आहेत. मात्र असे धंदे सुरु राहणे संबंधित पोलीस निरीक्षकांना परवडणारे नाही. गैरप्रकार उघड झाल्यास अशा पोलीस निरीक्षकांची गच्छंती अटळ आहे. त्यांची बदली थेट पोलीस नियंत्रण कक्षाला होऊ शकते, अशी भीती पोलीस दलात आहे.

Action taken by Tihar administration after Delhi Chief Minister Arvind Kejriwal  blood sugar rises
केजरीवालांना इन्सुलिन; रक्तातील साखर वाढल्यानंतर तिहार प्रशासनाकडून कार्यवाही
Kidnapping of officer in case of embezzlement in Kolhapur Zilla Parishad
कोल्हापूर जिल्हा परिषदेतील अपहारप्रकरणी अधिकाऱ्याचे अपहरण, मारहाण प्रकरणाच्या चौकशीसाठी समिती नियुक्त
retired employees of KEM
केईएममधील सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे ठिय्या आंदोलन
youth from pune who worked in merchant navy missing
मर्चंट नेव्हीत काम करणारा पुण्यातील तरूण बेपत्ता… झाले काय?