महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा रविवारी मुंबईत महामोर्चा निघणार आहे. मुंबईसह महाराष्ट्रात बेकायदा वास्तव्य करणाऱ्या पाकिस्तानी, बांगलादेशी घुसखोरांना हाकलून लावण्यासाठी मनसेकडून हा महामोर्चा आयोजित करण्यात आला आहे. महामोर्चा यशस्वी व्हावा यासाठी राज्यभरातील मनसे कार्यकर्ते जोरदार तयारी करत आहेत. पुण्यातही मनसे कार्यकर्त्यांना ‘राजगर्जना बाईक रॅली’ काढण्याचा निर्णय घेतला होता. पण पोलिसांनी त्यांना परवानगी नाकारली आहे.

पुणे पोलिसांना वाहतुकीवर परिणाम होईल सांगत बाईक रॅलीला परवानगी देण्यास नकार दिला आहे. तसंच या रॅलीमुळे नागरिकांना त्रास होईल असंही सांगण्यात आलं आहे. पुणे जिल्हाधिकारी कार्यालयाजवळून या रॅलीला सुरुवात होणार होती. मनसे कार्यकर्त्यांनी मात्र मुस्लिमबहुल भागातून रॅली जात असल्यामुळे पोलिसांनी परवानगी नाकारली असल्याचा आरोप केला आहे.

पोलिसांना परवानगी नाकारल्यानंतरही मनसे कार्यकर्त्यांनी बाईक रॅली काढण्याचा निर्णय घेतला होता. यामुळे पोलिसांनी कारवाई करत काही कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं आहे. नारायण पेठ पोलिसांकडून ही कारवाई करण्यात आली आहे. त्यामुळे ही रॅली पार पडणार की नाही याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे. दरम्यान रविवारी दुपारी १२ वाजता मनसेच्या महामोर्चाला सुरुवात होणार आहे. दुपारी बारा वाजता मोर्चा सुरु होईल. गिरगाव चौपाटीपासून आझाद मैदानापर्यंत हा मोर्चा काढण्यात येणार आहे.