पुण्यातील वारजे भागातील एका सोसायटीमध्ये मागील अनेक वर्षांपासून राहत असलेल्या चौघी मैत्रिणी अनेक दिवसापासून घरीच होत्या. आपण कुठे तरी फिरायला जाऊयात अशी चर्चा त्यांच्यात सुरु होती. पण नेमकं कुठं जायचं असा विचार सुरू असताना. आपण मुंबईला समुद्र पहायला जाऊया असं ठरलं आणि यासाठी पैशांची जुळवाजुळव सुरु झाली. त्यांनी काही पैसे जमवले तसंच पैंजण विकली आणि मुंबई गाठली. पण काही तासांत पोलिसांनी या अल्पवयीन तरुणींना ताब्यात घेऊन कुटुंबीयांच्या स्वाधीन केलं.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वारजे भागातील सोसायटीमध्ये राहणाऱ्या या १३ ते १६ वयोगटातील चौघी मैत्रिणी गेल्या कित्येक दिवसांपासून घरीच बसून होत्या. त्यांच्यामध्ये सतत गप्पागोष्टी होत होत्या. तेव्हा आपण मुंबईचा समुद्र पाहायला जाऊ, अशी चर्चा झाली. या चर्चेला साधारण महिना झाला होता. पण मुंबईला जायचे म्हटल्यावर पैसे खूप लागतील, म्हणून पैसे जमवण्यास सुरुवात केली. तरी देखील जेवढी रक्कम पाहिजे तेवढी काही रक्कम जमा झाली नाही. त्यावर आता पैंजण विकून मुंबई गाठायची असा निश्चय चौघींनी केला. त्यानंतर ठरल्याप्रमाणे लक्ष्मी रोडवरील सोन्या मारुती चौकातील एका दागिन्याच्या दुकानात पैंजण विकले. स्वतः जवळ असलेली काही रक्कम अशी मिळून साधारण चार हजार रुपये होते. त्यानंतर रविवारी दुपारच्या सुमारास त्या चार मैत्रिणी घरातून बॅगा घेऊन स्वारगेट एसटी स्थानकात आल्या. तेथून पनवेल आणि नंतर दादर येथे पोहोचून मग रेल्वेने सीएसटीला पोहोचल्या.

आणखी वाचा- कोलकात्यातून पळालेली महिला सापडली वाशीमध्ये

एकीकडे मुली प्रवास करत असताना त्या अजून घरी आल्या नाहीत यामुळे चौघीच्या घरामधील मंडळी चिंतेत होते. अखेर रात्री आठ वाजण्याच्या सुमारास त्यांनी पोलिसांकडे तक्रार दिली. पोलिसांनी मोबाइलचे लोकेशन तपासले असता त्या मुंबईला जात असल्याचं स्पष्ट झालं आणि त्यानंतर मुंबई कंट्रोल रूममध्ये याबाबत सर्व माहिती दिली. संबधित अधिकार्‍यांना मुलींचे फोटो पाठवण्यात आले. पोलिसांनी तपास सुरु केला आणि काही वेळात सीएसटी रेल्वे स्थानकात त्या मुली दिसताच त्यांना ताब्यात घेतलं. चौकशी केल्यावर आम्ही मुंबईमधील समुद्रकिनारा पाहण्यासाठी आलो असल्याचं त्यांनी सांगितलं. मुलींना कुटुंबीयांच्या स्वाधीन केलं असल्याचं वारजे पोलिसांनी सांगितलं आहे.