News Flash

पुणे पोलिसांना वाढदिवसाची सुट्टी

पोलीस शिपाई ते सहपोलीस आयुक्त दर्जाचे अधिकारी वाढदिवसाच्या दिवशी सुट्टी घेऊ शकणार आहेत.

पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला यांचा निर्णय; शहर पोलीस दलातील दहा हजार कर्मचाऱ्यांना लाभ मिळणार

पोलिसांचे काम म्हणजे ‘ऑन डय़ुटी चोवीस तास.’ महत्त्वाच्या व्यक्तींचा बंदोबस्त, सणवार तसेच गंभीर गुन्ह्य़ांच्या तपासात सतत व्यस्त असणाऱ्या पोलिसांना हक्काची सुट्टी देखील मिळण्याची शाश्वती नसते. सुट्टी कधी रद्द होईल, याचा नेम नसतो. ही परिस्थिती लक्षात घेऊन पुण्याच्या पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला यांनी पोलिसांना वाढदिवसाच्या दिवशी विशेष सवलत देण्याचा निर्णय घेतला आहे. पोलिसांना कुटुंबीयांसोबत वाढदिवस साजरा करता यावा, या हेतूने पोलिसांना वाढदिवसाच्या दिवशी सुट्टी द्यावी असे आदेश शहरातील सर्व पोलीस ठाण्यातील वरिष्ठ पोलीस निरिक्षकांना शुक्ला यांनी दिले आहेत.

पोलीस आयुक्तांनी घेतलेल्या या निर्णयाचा लाभ पुणे पोलीस दलातील दहा हजार कर्मचाऱ्यांना मिळणार आहे. पोलीस शिपाई ते सहपोलीस आयुक्त दर्जाचे अधिकारी वाढदिवसाच्या दिवशी सुट्टी घेऊ शकणार आहेत. पोलीस दलातील सर्वानी त्यांच्या कुटुंबीयांसोबत वाढदिवस साजरा करावा या विचाराने पोलीस आयुक्तांनी वाढदिवसाच्या दिवशी सुट्टी देण्याचा निर्णय घेतला आहे. या आदेशामुळे शहरातील वरिष्ठ अधिकाऱ्यांसह पोलीस शिपाई देखील सुखावले आहेत. महत्त्वाचा बंदोबस्त आला किंवा शहरात कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला, की पोलिसांच्या सुट्टय़ा लगेच रद्द केल्या जातात. त्यांना कामावर हजर राहावे लागते. सणावाराच्या दिवशीही पोलिसांना सुट्टी दिली जात नाही. अन्य सरकारी कर्मचाऱ्यांना सणवाराला सुट्टी मिळते. मात्र, पोलिसांना या सुट्टय़ांचा लाभ मिळत नाही.

गणेशोत्सव, दिवाळीत तर पोलिसांच्या साप्ताहिक सुट्टय़ा हमखास रद्द केल्या जातात. आठवडय़ातून मिळणारी हक्काची सुट्टी देखील रद्द होण्याची शक्यता असते. त्यातच पोलीस ठाण्यातील वरिष्ठ पोलीस निरीक्षक समजूतदार असेल, तर पोलिसांना सुट्टय़ा घेण्यास फारशी हरकत घेतली जात नाही. मात्र, बऱ्याचदा हक्काची रजा मागणाऱ्या पोलिसांची विनवणीही डावलण्यात येते. अन्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या तुलनेत पोलिसांच्या कामाची वेळ जास्त असते. सकाळी नऊ वाजता पोलीस ठाण्यात हजर झालेला पोलीस शिपाई असो वा अधिकारी तो रात्री दहानंतर घरी जातो. त्यामुळे कुटुंबीयांकडे लक्ष देण्यास पोलिसांना वेळ नसतो. पोलीस कायम तणावाखाली असतात. त्यामुळे कौटुंबिक वादही निर्माण होतो. मुलांकडे लक्ष देण्यास वेळ नसतो. त्यामुळेच पोलिसांना वाढदिवसाची सुट्टी देण्याचा निर्णय योग्य आहे, अशी प्रतिक्रि या पोलीस दलातून व्यक्त करण्यात आली आहे.

निर्णय केवळ पुणे पोलिसांपुरताच

वाढदिवसाच्या सुट्टी देण्याचा आदेश फक्त पुणे पोलीस आयुक्तालयांतील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसाठी असून राज्यातील अन्य शहरातील पोलीस आयुक्तालयात पोलिसांना वाढदिवसाची सुट्टी दिली जात नाही. मुंबई पोलीस दलात देखील पोलिसांना वाढदिवसाची सुट्टी दिली जात नाही.

सुट्टय़ांचे दिवस

  • पोलिसांना मिळणारी हक्काची रजा- ४५ दिवस
  • आजारपणाची रजा- २० दिवस
  • कुत्रे चावणे- ७ दिवस
  • माकड चावणे- २१ दिवस
  • कुटुंबनियोजन शस्त्रक्रिया- ७ ते १५ दिवस
  • प्रसूती रजा- १९० दिवस

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 24, 2016 4:01 am

Web Title: pune police get birthday leave
Next Stories
1 उद्यानात मद्य मेजवान्या
2 नेत्यांची नातीगोती अन् अनिश्चित वातावरण
3 ‘आकुर्डीतही सापांसाठी ‘रेस्क्यू’ केंद्र आवश्यक’
Just Now!
X