पुणे पोलिसांनी ५०० आणि १ हजाराच्या नोटा बाळगणाऱ्या पाच जणांच्या टोळीला अटक केली आहे. त्यांच्याकडून ५०० आणि १ हजाराच्या चलनातून बाद झालेल्या ३ कोटींच्या नोटा या पाच जणांकडून जप्त करण्यात आल्या आहेत. या पाचही जणांना पुणे पोलिसांनी अटक केली आहे आणि त्यांची रवानगी तुरुंगात करण्यात आली आहे. ५०० आणि १ हजारांच्या नोटांचे हे लोक करणार होते? एवढ्या मोठ्या प्रमाणात या नोटा का आणल्या गेल्या याची चौकशी पोलिसांकडून सुरू आहे.

८ नोव्हेंबर २०१६ ला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नोटाबंदीचा निर्णय जाहीर केला. ५०० आणि १ हजाराच्या नोटा चलनातून बाद करण्यात आल्या. काळा पैसा रोखण्यासाठी हा निर्णय घेतल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केले. मात्र या निर्णयावर सर्वाधिक टीका झाली. तसेच या निर्णयामुळे अर्थव्यवस्था मागे गेली अशी टीका पंतप्रधान नरेंद्र मोदींवर अजूनही होते आहे. २ हजार आणि ५०० च्या नव्या नोटा चलनात आल्या. तसेच जुन्या नोटा बदलून घेण्यासाठी मुदतही देण्यात आली होती. त्या दरम्यान आणि त्यानंतरही जुन्या नोटांच्या तस्करीचे प्रकार उघडकीस आले होते. आता पुन्हा एकदा पुण्यात तशाच प्रकारची कारवाई झाल्याच दिसते आहे.