पती आणि पत्नीमध्ये क्षुल्लक कारणावरून वाद होण्याच्या घटना अनेकदा समोर येत असतात. त्यावरून थेट विभक्त होण्याचा निर्णयापर्यंत अनेकजण जातात. अशाच स्वरूपाची घटना पुण्यात लॉकडाउनच्या दरम्यान घडली. दोघांनी एकमेकांचे नंबरदेखील ब्लॉक केले. त्यामुळे दोघांमध्ये काहीच संवाद होत नव्हता. पतीने पुढाकार घेतला आणि अखेर भरोसा सेलच्या मदतीने आता दोघे एकत्र राहू लागले आहेत. संसाराची घडी विस्कटता विस्कटता रेशीमगाठी पुन्हा जुळून आणण्याचे काम भरोसा सेलने केल्याचेच म्हणावे लागेल.

या दांपत्याचे घरच्यांच्या सहमतीने लग्न झाले होते. सर्व काही ठिकठाक सुरू होते. पण क्षुल्लक कारणावरून झालेल्या वादामुळे पत्नी माहेरी निघून गेली. दोन्ही बाजूच्या कुटुंबीयांनी एकत्र आणण्याचा कोणत्याही प्रकाराचा प्रयत्नदेखील केला नाही. वाद इतका टोकाला गेला की, अखेर विभक्त होण्याच्या निर्णयापर्यंत पोहोचले.

याचदरम्यान दोघांनी एकमेकांचे मोबाइल नंबर ब्लॉक करून ठेवले. त्यामुळे कोणत्याही प्रकारचा संवाद होण्याचा प्रश्नच येत नव्हता. दुसरीकडे करोना आजाराने थैमान घातले होते आणि लॉकडाउन जाहीर केला. यामुळे कोणालाही बाहेर पडणे शक्य नव्हते. वर्क फ्रॉम होम असल्याने सुरुवातीला पतीला काही वाटले नाही. पण नंतर त्याला एकटेपणा जाणवू लागला.

आणखी वाचा- पुण्यात १२२९ रोड रोमियोंविरोधात दामिनी पथकाकडून कारवाई; पुणे पोलिसांचं सर्वसामान्यांकडून कौतुक

तो प्रचंड नैराश्यात आला होता. यामुळे काय करावे हे त्याला सुचत नव्हते. खूप वाईट विचार मनामध्ये येत होते. लॉकडाउन शिथिल झाल्यानंतर पतीन भरोसा विभागाकडे घडलेली सर्व हकिकत सांगितली. मला माझ्या पत्नी सोबत एकत्र रहायचे आहे. काही तरी मार्ग काढा असा अर्ज केला. त्यावर भरोसा विभागा मार्फत संबधित महिलेशी संवाद साधला. दोघांमधील गैरसमज दूर करण्यात आले आणि पुन्हा त्यांना एकत्र आणलं.

कुटुंबीयांसोबत कोणत्याही विषयावर व्यक्त व्हा: सहाय्यक पोलिस निरीक्षक सुजाता शानमे
“महिला सहाय्य कक्षाकडे पती-पत्नीमधील वादाच्या घटनांची अनेक प्रकरणं येत असतात. यंदा महिला सहाय्य कक्षात २०२० मध्ये २०७३ अर्ज आले असून ८०७ अर्जामध्ये तोडगा निघाला आहे. ते एकत्रित राहत असून ८०० अर्ज प्रगतीपथावर आहे. त्यात देखील आमच्या टीमला यश मिळेल. पण एक वाटते की, आपल्याला कोणतीही समस्या असल्यास पहिल्यांदा कुटुंबातील व्यक्ती किंवा अगदी जवळच्या व्यक्ती सोबत शेअर करा. त्यामधून देखील निश्चित मार्ग निघू शकतो. कुटुंबासोबत संवाद नसल्यास वाद विकोपाला जाऊ शकतात. याबाबतची काळजी प्रत्येकाने घेतली पाहिजे. त्यामुळे कुटुंबीयांसोबत कोणत्याही विषयावर व्यक्त व्हा, एवढेच मी समाजाला आवाहन करेन,” असं सुजाता शानमे यांनी म्हटलं आहे.