भीमा कोरेगाव हिंसाचार प्रकरणाचा तपास करत असलेल्या पुणे पोलिसांना काँग्रेस नेते दिग्विजय सिंह यांच्याशी निगडीत काही महत्वाचे धागेदोरे हाती लागले आहेत. बंदी घालण्यात आलेल्या सीपीआयएमच्या कार्यकर्त्यांच्या तपासादरम्यान मिळालेल्या माहितीवरुन पुणे पोलीस दिग्विजय सिंह यांची चौकशी करण्याची शक्यता आहे. गेल्या काही दिवसांत या प्रकरणात ज्या हायप्रोफाइल कार्यकर्त्यांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्या एका पत्रात दिग्विजय सिंह यांचा मोबाइल क्रमांक मिळाला आहे. सीपीआयएमच्या कार्यकर्त्यांकडून हे पत्र जप्त करण्यात आल्याचा पुणे पोलिसांनी दावा केला आहे. २५ सप्टेंबर २०१७ रोजी लिहिलेल्या या पत्रात ‘कॉम्रेड प्रकाश’ने विद्यार्थ्यांचा वापर करत राष्ट्रीय स्तरावर विरोध करण्यासाठी काँग्रेस नेता त्यांची मदत करण्यास इच्छुक असल्याचे ‘कॉम्रेड सुरेंद्र’ यांना म्हटले होते. या पत्रात एक फोन क्रमांकही लिहिला आहे. हा क्रमांक काँग्रेस नेते दिग्विजय सिंह यांचा आहे. पुणे पोलिसांच्या मते, कॉम्रेड सुरेंद्र म्हणजे सुरेंद्र गडलिंग यांच्याशी संदर्भात आहे. जे नागपूरमध्ये वकिली करतात. त्यांना जूनमध्ये पोलिसांनी अटक केली होती. तर कॉम्रेड प्रकाश हे सीपीआयएमच्या वरिष्ठ नेत्यांपैकी एक आहेत.
पुणे पोलिसांनी अटक केलेल्या कार्यकर्त्यांचे नक्षलवाद्यांशी संबंध असल्याचे सिद्ध करण्यासाठी पुरावा म्हणून न्यायालयात पत्र सादर केल्यानंतर त्यातील मजकूर सार्वजनिक झाला होता. त्यावेळी दिग्विजय सिंह यांनी सरकारला हिंमत असेल तर मला अटक करा, असे आव्हान दिले होते. जर मी दोषी असेल.. तर मी केंद्र आणि राज्य सरकारला आव्हान देतो की त्यांनी मला अटक करुन दाखवावावेच, असे माध्यमांशी बोलताना म्हटले होते. याप्रकरणी पोलीस उपायुक्त सुहास बावचे यांनी या पत्रात लिहिलेल्या मजकुराचा तपास केला जात असल्याचे ‘इंडियन एक्स्प्रेस’शी बोलताना सांगितले. परंतु, त्यांनी पत्रात काय लिहिले आहे, हे सांगण्यास नकार दिला.
४ सप्टेंबरला दिग्विजय सिंह यांनी आव्हान दिले होते..
Agar aisa hai, to mujhe sarkaar giraftar kare. Pehle deshdrohi, ab Naxali. Isiliye, yahin se giraftar mujhe karaiye: Congress' Digvijay Singh on BJP's Sambit Patra statement that Singh's phone number has come up in documents found in anti-Naxal raids pic.twitter.com/I6CKGQOz3c
— ANI (@ANI) September 4, 2018
पोलिसांतील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, हा फोन क्रमांक दिग्विजय सिंह यांच्याशी निगडीत असून याप्रकरणी त्यांची चौकशी होण्याची शक्यता आहे. दरम्यान याचवर्षी जूनमध्ये पुणे पोलिसांनी पाच कार्यकर्त्यांना अटक केली होती. यामध्ये सुरेंद्र गडलिंग आणि नागपूर येथील प्राध्यापक शोमा सेन यांचाही समावेश आहे. अटकेत असलेल्या कार्यकर्त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हत्येचा कट रचल्याचा दावा पोलिसांनी केला आहे. तसेच त्यांच्याकडून अनेक संशयित दस्तऐवज जप्त करण्यात आले आहेत. याप्रकरणी पोलिसांनी आणखी पाच कार्यकर्त्यांना अटक केली आहे. परंतु, सर्वोच्च न्यायालयाने नंतर त्यांना नजरकैदेत ठेवण्याची परवानगी दिली होती. पोलिसांनी याप्रकरणी आतापर्यंत २२ जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on November 19, 2018 9:11 am