चौकात पोलीस नसल्यावर बिनधास्तपणे सिग्नल तोडणाऱ्या, पोलीस समोर असतानाही झेब्रा क्रॉसिंगवर गाड्या उभ्या करणाऱ्या, वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांना शिस्त लावण्यासाठी पुणे पोलिसांच्या वाहतूक शाखेने आता सीसीटीव्हीमधील छायाचित्रणाच्या माध्यमातून कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. मंगळवारपासून बेशिस्त वाहनचालकांना आंतरदेशीय पत्राद्वारे त्यांनी केलेल्या वाहतुकीच्या नियमाच्या उल्लंघनाची माहिती दिली जाणार असून, त्यांच्याकडून तडजोड शुल्काची आकारणी केली जाणार असल्याचे पुण्यातील वाहतूक शाखेचे पोलीस उपायु्क्त डॉ. प्रविण मुंढे यांनी एका पत्रकाद्वारे स्पष्ट केले.
पुण्यातील वाहनचालकांकडून बिनधास्तपणे वाहतुकींच्या नियमांचे उल्लंघन केले जात असल्याची चर्चा सातत्याने होते. आता याच वाहनचालकांना शिस्त लावण्यासाठी वाहतूक शाखेने पुढाकार घेतला आहे. पुणे शहराच्या सुरक्षेसाठी वेगवेगळ्या ठिकाणी १२३६ सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. याच कॅमेऱ्याद्वारे आता नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांचीही माहिती जमविली जाणार असून, संगणकीय यंत्रणेद्वारे त्यांचा नाव आणि पत्ताही उपलब्ध होणार आहे. त्यामुळे या वाहनचालकांच्या पत्त्यावर एक आंतरदेशीय पत्र पाठवून वाहनचालकांना त्यांनी वाहतुकीचा कोणता नियम, कधी मोडला याची माहिती दिली जाईल. त्यानंतर संबंधित वाहनचालकाला पुढील सात दिवसांत पत्रात नमूद केलेल्या वाहतूक विभागात जाऊन तडजोड शुल्क भरावे लागेल. जर सात दिवसांमध्ये वाहनचालकाने तडजोड शुल्क भरले नाही, तर त्याच्याविरोधात पुण्यातील प्रथमवर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांपुढे खटला दाखल केला जाणार आहे. त्यामुळे त्या वाहनचालकाला खटल्याच्या कारवाईला समोर जावे लागेल, असे या पत्रकात म्हटले आहे.
पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील वाहनचालकांवर सीसीटीव्हीच्या माध्यमातून लक्ष ठेवण्यात येणार असून, त्यांच्याकडून नियमांचे उल्लंघन झाल्यास त्यांच्यावर कारवाई केली जाणार आहे. यासाठी विविध चौकांमध्येही सीसीटीव्हीच्या माध्यमातून विशेष लक्ष ठेवण्यात येणार आहे. या कारवाईच्या भितीने तरी वाहनचालक वाहतुकीचे नियम पाळणार का हे पाहणे उत्सुकतेचे आहे.