लूटमारीच्या घटनेनंतर पोलिसांकडून गुन्ह्यची नोंद, मात्र तक्रारदारच बेपत्ता

पुणे : भरदिवसा दुचाकीस्वाराला धमकावून त्याच्याकडील पावणेपाच लाखांची रोकड लुटण्यात आल्याची खळबळजनक घटना मंगळवारी ऐन गर्दीच्या कर्वे रस्त्यावर एसएनडीटी महाविद्यालयानजीक घडली. गजबजलेल्या रस्त्यावर झालेल्या लुटमारीच्या या गुन्ह्य़ानंतर पोलीसही चक्रावून गेले आणि त्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. ज्याची रोकड लुटण्यात आली होती त्या तक्रारदाराकडे पोलिसांनी चौकशी सुरू केली. चौकशी सुरू झाल्यावर तक्रारदार थोडय़ाच वेळात पोलीस ठाण्यात पोहोचतो, असे सांगून पोलीस ठाण्यातून जो गेला तो ठाण्यात परतलाच नाही. गुन्हा घडूनही तक्रारदार न आल्याने पोलिसांना चोरांऐवजी तक्रारदाराचा शोध सुरू करावा लागला.

कर्वे रस्त्यावर एसएनडीटी महाविद्यालयानजीक मंगळवारी दुपारी साडेचारच्या सुमारास दुचाकीस्वाराला अडवून चोरटय़ांनी त्याच्याकडील पावणेपाच लाख रुपयांची रोकड असलेली पिशवी हिसकावून नेली. त्यानंतर दुचाकीस्वार स्वत: डेक्कन पोलीस ठाण्यात गेला आणि त्याने या घटनेची माहिती दिली. डेक्कन पोलीस ठाण्यातील वरिष्ठ अधिकारी आणि तपास पथकातील पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी घटनाक्रम जाणून घेतला आणि दुचाकीस्वाराची चौकशी सुरू केली. चोरटय़ांनी हातावर फटका मारून पिशवी हिसकावून नेल्याचे दुचाकीस्वाराने पोलिसांना सांगितले. काही वेळात तक्रार देण्यासाठी पोलीस ठाण्यात येतो, असे सांगून तेथून दुचाकीस्वार गेला. दरम्यान, पोलिसांनी तातडीने तपास सुरू केला. गुन्हे शाखेचे पथक घटनास्थळी पोहोचले.

कर्वे रस्ता, विधी महाविद्यालय रस्ता भागातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांकडून करण्यात आलेले चित्रीकरण पोलिसांनी पडताळण्यास सुरुवात केली. चोरटय़ांच्या  वर्णनानुसार संशयिताचा माग काढण्यास सुरुवात करण्यात आली. गजबजलेल्या रस्त्यावर भरदिवसा लुटमारीची घटना घडल्यामुळे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तातडीने चोरटय़ांचा माग काढण्याची सूचना दिली होती. त्यामुळे पोलिसांनी युद्धपातळीवर तपास सुरू केला. तपास सुरू असताना तक्रारदार मंगळवारी रात्रीपर्यंत पोलीस ठाण्यात फिरकला नाही. त्यामुळे पोलिसांची चलबिचल सुरू झाली. त्यानंतर बुधवारी सकाळीही तक्रारदार न आल्याने पोलिसांनी तक्रारदाराचा शोध घेण्यास सुरुवात केली. अखेर सायंकाळी राहुल दत्तात्रय तावरे (वय २८, रा. एनडीए रस्ता, शिवणे) याने डेक्कन पोलीस ठाण्यात येऊन तक्रार नोंदवली. गुन्हा घडल्यानंतर चोवीस तासांनंतर तक्रारदार उपस्थित झाला. मात्र तत्पूर्वी तक्रारदाराचा शोध घेण्यात पोलिसांचे चोवीस तास खर्च झाले होते.

या घटनेबाबत डेक्कन पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक हेमंत भट म्हणाले, कर्वे रस्त्यावरील लुटमारीच्या प्रकरणात तक्रारदार पोलीस ठाण्यात येतो, असे सांगून गेला. त्यानंतर तो बुधवारी सायंकाळी परतला. दरम्यान, पोलिसांच्या पथकाकडून तक्रारदाराचा शोध घेण्यात येत होता. या प्रकरणात गुन्हा दाखल करून तपास सुरू करण्यात आला आहे.