• मद्यपी वाहनचालकांची तपासणी
  • हुल्लडबाजांवर कारवाईसाठी पथके
  • संभाव्य घातपातांच्या पाश्र्वभूमीवर पोलीस सतर्क

नववर्षांनिमित्त पुणे आणि पिंपरी शहर परिसरात पोलिसांकडून रविवारी (३१ डिसेंबर)बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे. हुल्लडबाजांवर कारवाई करण्यासाठी पोलिसांकडून गर्दीच्या भागात पथके तैनात करण्यात येणार आहेत. मद्यपी वाहनचालकांची तपासणी करण्यासाठी वाहतूक पोलिसांकडून ब्रीथ अ‍ॅनलायजर यंत्रणेचा वापर करण्यात येणार आहे. मद्य पिऊन वाहने चालविणाऱ्या चालकांवर कारवाई करण्यात येणार आहे.

नववर्षांच्या स्वागतासाठी लष्कर भागातील महात्मा गांधी रस्ता, कोरेगाव पार्क परिसर तसेच डेक्कन भागातील जंगलीमहाराज रस्ता, फर्गसन रस्त्यावर तरुणाईची गर्दी उसळते. या भागात पोलिसांकडून विशेष बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे. हुल्लडबाजांवर कारवाई करण्यासाठी पोलिसांकडून कारवाई करण्यात येणार आहे. साध्या वेशातील पोलिसांची पथके गर्दीच्या ठिकाणी गस्त घालणार आहेत. रविवारी सायंकाळी सहानंतर शहराच्या वेगवेगळ्या भागांत बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. पहाटेपर्यंत शहरात बंदोबस्त कायम राहणार आहे. संभाव्य घातपाती कारवायांच्या पाश्र्वभूमीवर पोलिसांना सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.  शहराबाहेरील रस्त्यांवर पोलिसांकडून बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. कोथरूड परिसरातील चांदणी चौक भागातील उपाहारगृहात नववर्षांच्या स्वागतासाठी गर्दी होती. या भागात पोलिसांकडून बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. पिंपरी शहर परिसरात २० पोलीस निरीक्षक, १३७ सहाय्यक निरीक्षक, उपनिरीक्षक, ६७० पोलीस शिपाई, शीघ्र कृती दल असा बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे.

उत्पादन शुल्क विभागाकडून कारवाई

नववर्षांनिमित्त शहरातील हॉटेल्स आणि बार पहाटेपर्यंत खुले राहणार आहेत. यंदाच्या वर्षी पोलीस तसेच उत्पादन शुल्क विभागाकडून संयुक्त पथके तयार करण्यात आली आहेत. बेकायदा मद्यपाटर्य़ावर उत्पादन शुल्क विभागाकडून कारवाई करण्यात येणार आहे. उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक मोहन वर्दे यांच्या मार्गदर्शनाखाली अवैध दारू विक्रीला आळा घालण्यासाठी भरारी पथके तयार करण्यात आली आहेत. भरारी पथकांकडून दौंड आणि हवेली तालुक्यातील अवैध दारू निर्मिती करणाऱ्या ठिकाणांवर छापे टाकण्यात आले. या कारवाईत २ हजार २७५ लिटर गावठी दारू, दारू निर्मितीसाठी लागणारे रसायन, असा ११ लाख ८ हजार रुपयांचा माल जप्त करण्यात आला. भरारी पथकाचे निरीक्षक नंदकुमार जाधव, जे. बी. होले या कारवाईत सहभागी झाले होते.