पुणे पोलिसांची भूमिका

पुणे : एल्गार परिषद प्रकरणाचा तपास केंद्रीय गृहमंत्रालयाने राष्ट्रीय तपास यंत्रणेकडे (एनआयए) सोपविला असला, तरी कागदपत्रांच्या पूर्ततेनंतर ‘एनआयए’ला पुढील तपासाबाबत सहकार्य करण्यात येणार असल्याची माहिती पुणे पोलीस दलातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली. एल्गार परिषद प्रकरणातील फिर्याद तसेच अन्य कागदपत्रे ‘एनआयए’च्या पथकाला देण्यात आली असली, तरी मूळ कागदपत्रे तसेच अन्य न्यायालयीन कागदपत्रे पोलीस महासंचालकांच्या आदेशानंतर ‘एनआयए’च्या पथकाकडे सोपविण्यात येणार आहेत.

एल्गार परिषद प्रकरणाचा तपास ‘एनआयए’कडे सोपविण्यात आल्यानंतर ‘एनआयए’चे पथक सोमवारी पुण्यात दाखल झाले. एल्गार परिषद प्रकरणाच्या अनुषंगाने तपास पथक पोलीस आयुक्तालयात आले. तपासपथकातील अधिकाऱ्यांनी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची भेट घेतली. एल्गार प्रकरणातील फिर्याद तसेच अन्य कागदपत्रे तपासपथकातील अधिकाऱ्यांना देण्यात आली. मात्र, मूळ कागदपत्रे ‘एनआयए’कडे सोपविण्यासाठी काही कागदपत्रांची पूर्तता करावी लागणार आहे. पोलीस महासंचालक सुबोध जायस्वाल यांच्या लेखी आदेशानंतर पुढील कार्यवाही करण्यात येईल, अशी माहिती पुणे पोलीस दलातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी मंगळवारी दिली.

एल्गार परिषद प्रकरणाची सुनावणी शिवाजीनगर जिल्हा सत्र न्यायालयातील विशेष न्यायालयात सुरू आहे. एल्गार परिषद प्रकरणाचा तपास पुणे पोलिसांकडून करण्यात येत होता. नक्षलवादी संघटनांशी संबंध असल्याच्या ठपका ठेवून मुंबई, दिल्ली, तेलंगणा येथे छापे टाकून सामाजिक चळवळीतील कार्यकर्त्यांना अटक करण्यात आली होती. एल्गार प्रकरणातील संशयितां विरोधात बेकायदा हालचाली प्रतिबंधक कायद्यानुसार (यूएपीए) कारवाई करण्यात आली होती.