माहिती देणाऱ्यास एक हजारांचे रोख बक्षीस

पुणे : मकरसंक्रांतीनिमित्त केल्या जाणाऱ्या पतंगबाजीत चिनी मांजाचा वापर केल्याने नागरिक तसेच पक्ष्यांना गंभीर स्वरूपाच्या इजा घडल्याने पोलिसांनी पतंग आणि मांजा विक्रेत्यावर छापे घातले. पोलिसांनी केलेल्या कारवाईत एकाही पतंग विक्रे त्यांकडे चिनी मांजा सापडला नाही. त्यामुळे पोलिसांनी आता चिनी मांजाची छुप्या पद्धतीने विक्री करणाऱ्यांची माहिती देण्याचे आवाहन नागरिकांना केले आहे. चिनी मांजाची विक्री करणाऱ्यास रोख एक हजारांचे बक्षीसही जाहीर करण्यात आले आहे.

संक्रांतीच्या कालावधीत शहरात हौशी पतंगबाजी करतात. गेल्या काही वर्षांपासून पतंगबाजी करणाऱ्यांकडून चिनी मांजाचा वापर केला जात आहे. चिनी मांजामुळे पादचारी, दुचाकीस्वार तसेच पक्ष्यांना इजा झाल्याच्या घटना घडल्या आहेत. गेल्या वर्षी भोसरी आणि शिवाजी पुलावर घडलेल्या दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोन दुचाकीस्वार महिलांना प्राण गमावावे लागले होते.

त्यानंतर पोलिसांनी चिनी मांजा विक्रेत्यांवर कारवाईची मोहीम हाती घेतली होती. यंदाही पोलिसांनी चिनी मांजाची विक्री करणाऱ्यांविरोधात विशेष मोहीम हाती घेतली.

त्यासाठी पोलिसांनी गुन्हे शाखेची सात पथके तयार केली होती तसेच स्थानिक पोलीस ठाण्यातील अधिकाऱ्यांना चिनी मांजा विक्रेत्यांवर कारवाई करण्याच्या सूचना दिल्या होत्या.

गुन्हे शाखेच्या सात पथकांनी सोमवारी रात्री उशिरापर्यंत शहराच्या वेगवेगळ्या भागांत तसेच रविवार पेठेतील बोहरी आळी परिसरात पतंग आणि मांजा विक्रेत्यांवर छापे टाकले. पोलिसांनी छापे टाकले पण शहरातील एकाही पतंग विक्रेत्याकडे मांजा आढळून आला नाही, अशी माहिती गुन्हे शाखेकडून देण्यात आली.

९७ ठिकाणी छापे; पण मांजा सापडला नाही

पोलिसांनी सोमवारी रात्री उशिरापर्यंत शहरातील ९७ पतंग विक्रेत्यांची तपासणी केली. त्यांच्या दुकानाची तपासणी केली. मात्र, या छापेमारीत चिनी मांजा सापडला नाही. त्यामुळे चिनी मांजाची माहिती देणाऱ्यास एक हजारांचे रोख बक्षीस जाहीर करण्यात आले आहे. मांजाची माहिती देणाऱ्याची माहिती गुप्त ठेवण्यात येईल. नागरिकांनी पोलीस नियंत्रण कक्ष (दूरध्वनी-१०० किंवा ८९७५२८३१०० किंवा ८९७५९५३१००) या क्रमांकावर माहिती द्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.