पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तीन मे पर्यंत लॉकडाउन वाढवण्याचा निर्णय घेतल्यामुळे अनेकांची निराशा झाली आहे. काही जणांनी लॉकडाउनचे नियम थोडे शिथिल होतील अशी अपेक्षा केली होती. अनेकांनी बऱ्याचदिवसांनी मित्रपरिवार, नातलगांना भेटण्याचे प्लान्सही आखले होते. पण आता सर्वांनाच तीन मे पर्यंत वाट पाहावी लागणार आहे.

पुण्यात असाच दोन मित्रांमधला सोशल मीडियावरील संवाद पोलिसांच्या नजरेस आला. त्यानंतर पोलिसांनी जो रिप्लाय दिला त्याने इंटरनेटवर नेटीझन्सची मने जिंकून घेतली आहेत.

पार्थ (@ParthEkal) आणि इंद्रजीत (@Jaggu_4) दोघांनी टि्वटरवर चॅटिंग करताना परस्परांना भेटण्याची इच्छा व्यक्त केली. दोघेही पुण्याचे आहेत. ‘तीन मे पर्यंत भेटणे शक्य होणार नाही’ असे पार्थने टि्वट केले. त्यावर इंद्रजीतने ‘आपण त्याआधी भेटू शकतो’ असा रिप्लाय दिला. त्यावर पार्थने ‘जग्गू, आपण आताही भेटू शकतो. तू माझ्या घराजवळच राहतोस. तू बोल फक्त कधी’ असे टि्वट केले.

हे चॅटिंग पुणे पोलीस इंटरसेप्ट करतील याची दोघांनीही कल्पना केली नव्हती. पण दोघांमधला हा मैत्रीचा संवाद पुणे पोलिसांच्या नजरेत आला. त्यावर पुणे पोलिसांनी पार्थ आणि इंद्रजीतला टॅग करत “हे! तुम्हाला भेटायला आम्हालाही आवडेल. तेवढीच आमची सोबत होईल तुम्हाला. तुम्ही फक्त सांगा कधी आणि कुठे भेटायचं?”असे टि्वट केले.

पोलिसांच्या या टि्वटने इंटरनेटवर अनेकांनी मने जिंकून घेतली आहेत. पण त्याचवेळी पार्थ आणि इंद्रजीतमधला संवाद पोलिसांनी कसा इंटरसेप्ट केला? याबद्दलही अनेकांना जाणून घ्यायचे आहे. पुणे पोलिसांच्या या रिप्लायवर अनेकांनी विनोद केले आहेत.

‘जग्गू तेरे शरीर का तोड देंगे कोना कोना पर नही होने देंगे तुझे करोना’ असे एका युझरने म्हटले आहे. पुणे पोलिसांचे टि्वटर अकाउंट हँडल करणाऱ्या व्यक्तीला २१ तोफांची सलामी असे दुसऱ्या एका युझरने म्हटले आहे. महाराष्ट्राच्या विविध शहरातील पोलीस नागरिकांना घरी थांबण्याचे आवाहन सातत्याने करत आहेत. त्यासाठी सोशल मीडियाचा अत्यंत प्रभावीपणे वापर करत आहेत.
बुधवारी भारतात करोना व्हायरसच्या रुग्णांची संख्या ११,९३३ पर्यंत पोहोचली आहे. मागच्या २४ तासात १११८ नवीन रुग्ण सापडले असून ३९ जणांचा मृत्यू झाला आहे.