साधे पेट्रोल ९६.६२ रुपये; तीन अंकी किमतीमुळे डिजिटल फलक बंद

पुणे : इंधनाच्या सातत्याने वाढणाऱ्या दरांमुळे अखेर पुण्यात पॉवर पेट्रोल शंभरीपार गेले असून, साधे पेट्रोल शंभरीच्या जवळ आले आहे. शनिवारी (२० फेब्रुवारी) शहरात पॉवर पेट्रोलचा दर १००.३१ रुपये, तर साध्या पेट्रोलचा दर ९६.६२ रुपये लिटर होता. शहरांतर्गत वाहतुकीसाठी राज्यात सर्वाधिक दुचाकी वाहनांचा वापर करणाऱ्या पुणेकरांना पेट्रोल दरवाढीच्या भडक्याचा सर्वाधिक फटका बसतो आहे. डिझेलचा दर ८६.३६ रुपये लिटर झाला आहे.

दरम्यान, पेट्रोलचा तीन अंकी दर अभूतपूर्व आहे. इंधनाच्या किमती दर्शविणाऱ्या पेट्रोल पंपावरील डिजिटल फलकांमध्ये तीन अंकी किंमत दर्शविण्याची व्यवस्थाच नाही. पॉवर पेट्रोल शंभरीपार गेल्यानंतर हे फलक बंद ठेवण्याशिवाय पेट्रोल पंप चालकांपुढे पर्यायच राहिला नाही.

पेट्रोल आणि डिझेलचे दर दररोज नवनवे उच्चांक निर्माण करीत आहेत. करोना काळातील करवाढ आणि नोव्हेंबरपासून आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमती वाढू लागल्याने इंधनाच्या दरांमध्ये वाढ सुरू झाली. २० नोव्हेंबरला पुण्यात पेट्रोलचे दर प्रतिलिटर ८७.६७ रुपये, तर डिझेलचे दर ७५.७१ रुपये होते. सप्टेंबर २०१८ मध्ये पेट्रोलचे दर नव्वदीच्या पार गेले होते. काही दिवस पेट्रोल ९१ ते ९३ रुपये लिटरने मिळत होते.

गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये पेट्रोलच्या दराने पुन्हा ९० रुपयांचा टप्पा ओलांडला. त्यानंतर सातत्याने काही पैशांनी पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढतच राहिले. १४ जानेवारीला पेट्रोलच्या दराने ९१ रुपयांचा टप्पा ओलांडला. २३ जानेवारीला पेट्रोल ९१.९५ रुपये लिटर झाले. त्यानंतर ५ फेब्रुवारीला त्यात मोठी वाढ होऊन पुण्यात पेट्रोल ९३.१४ रुपये लिटरवर पोहोचले.

पुण्यात यापूर्वी कधीच पेट्रोलचे दर ९३ रुपयांपुढे गेले नव्हते. त्यामुळे ५ फेब्रुवारीचा दर उच्चांकी ठरला. त्यानंतरही दरात सातत्याने वाढ सुरूच राहिल्याने दराचा रोज नवा उच्चांक होतो आहे. ११ फेब्रुवारीला शहरात पेट्रोल ९४ रुपये लिटर, तर डिझेल ८३.३१ रुपये लिटरवर पोहोचले. २० फेब्रुवारीला पेट्रोलच्या दराने ९६ रुपये, तर डिझेलच्या दराने ८६ रुपयांचा टप्पा पार केला. गेल्या महिनाभराच्या कालावधीत पेट्रोलच्या दरामध्ये लिटरमागे सहा रुपयांची वाढ नोंदविण्यात आली.