सावित्रीबाई फु ले पुणे विद्यापीठाच्या अंतिम वर्षांच्या परीक्षांसाठी बहुपर्यायी स्वरूपाच्या प्रश्नपत्रिकांसाठी प्रश्नसंच तयार करण्याचे काम सुरू आहे. मात्र, पदवी अंतिम वर्ष आणि पदव्युत्तर पदवी द्वितीय वर्षांच्या मराठी विषयाच्या प्रश्नसंचातील काही प्रश्न व्हॉट्सअ‍ॅपद्वारे विद्यार्थ्यांना दिल्याचा प्रकार समोर आला आहे. त्यामुळे या प्रकाराची दखल घेऊन व्हॉट्सअ‍ॅपवर देण्यात आलेले संबंधित प्रश्न अंतिम प्रश्नसंचातून वगळण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

विद्यापीठाकडून १२ ते ३१ ऑक्टोबर दरम्यान ऑनलाइन आणि ऑफलाइन पद्धतीने अंतिम वर्षांच्या परीक्षा घेतल्या जाणार आहेत. त्यात  बहुपर्यायी स्वरूपाची प्रश्नपत्रिका असेल. या परीक्षेचे स्वरूप विद्यार्थ्यांना कळण्यासाठी ६ ते १० ऑक्टोबर दरम्यान सराव चाचण्यांची सुविधा देण्यात येणार असल्याचे विद्यापीठाने जाहीर केले आहे. बहुपर्यायी प्रश्नपत्रिके साठी विद्यापीठाच्या अभ्यास मंडळ सदस्यांकडून प्रत्येक विषयाचे वेगवेगळे प्रश्नसंच तयार केले जाणार आहेत.

असे असतानाही एका नामांकित महाविद्यालयातील प्राध्यापिकेने पदवी अंतिम वर्ष आणि पदव्युत्तर पदवी द्वितीय वर्षांच्या विद्यार्थ्यांना मराठी विषयाच्या प्रश्नसंचातील काही प्रश्न व्हॉट्सअ‍ॅपद्वारे पाठवल्याचा प्रकार समोर आला आहे.

विशेष म्हणजे संबंधित प्राध्यापिके चा विद्यापीठाच्या अभ्यास मंडळाशी संबंध नसतानाही हा प्रकार झाला आहे. तसेच अभ्यास मंडळाच्या सदस्यांनी प्रश्नसंच मोबाइलमध्ये ठेवणे चूक असून, हा घडलेला संपूर्ण प्रकार गंभीर असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

परीक्षांसाठी प्रश्नसंच तयार करण्याचे काम अजून सुरू आहे. व्हॉट्सअ‍ॅपद्वारे पाठवले गेलेले प्रश्न अंतिम प्रश्नासंचातून वगळले जातील. अंतिम वर्षांच्या परीक्षा अतिशय काळजीपूर्वक आणि निष्पक्षपणे घेतल्या जातील. कोणताही गैरप्रकार होणार नाही.

– डॉ. शिरीष लांडगे,

मराठी अभ्यास मंडळ प्रमुख, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ

प्रश्नसंचाच्या गोपनीयतेची विद्यापीठाकडून पूर्ण काळजी घेतली जाईल. आवश्यकतेनुसार नवीन प्रश्नसंच तयार केले जातील. गैरप्रकार झाला असल्यास संबंधित घटकांवर विद्यापीठ कायद्यानुसार कारवाई केली जाईल.

– डॉ. महेश काकडे,

संचालक, परीक्षा व मूल्यमापन मंडळ, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ