12 December 2018

News Flash

पुण्यातील महिलांनी तयार केलेल्या गोधडीला परदेशात पसंती

‘क्विल्ट कल्चर’ची परदेशी नागरिकांनाही भुरळ

‘क्विल्ट कल्चर’ची परदेशी नागरिकांनाही भुरळ

सध्या पर्यावरणपूरक वस्तूंना म्हणजे ‘इको फ्रेंडली’ वस्तूंना चांगली मागणी आहे. त्यातूनच टाकाऊतून टिकाऊची चर्चाही सातत्याने होत असते. टाकाऊतून टिकाऊ या संकल्पनेचे उत्तम प्रतीक असलेली गोधडी महाराष्ट्रातील घराघरांमध्ये गेली कित्येक वर्षे शिवली जाते. ही गोधडी फक्त टिकाऊच नाही तर उबदारही असते. फेसबुकसारख्या आधुनिक समाजमाध्यमाची जोड देत ही पारंपरिक गोधडी आता आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत पोहोचली आहे. ही किमया केली आहे पुण्याच्या ‘क्विल्ट कल्चर’ या ब्रँडने! अर्चना जगताप आणि ऋचा कुलकर्णी या पुण्याच्या दोन युवतींनी हा उपक्रम चालवला आहे.

पुण्याच्या कोंढवा बुद्रुक या शहराजवळ असलेल्या, तरी आपले गावपण टिकवून ठेवलेल्या परिसरामध्ये महिलांसाठी काय करता येईल याचा विचार करताना अर्चनाला गोधडीच्या उद्योगाची कल्पना सुचली. गोधडी आपल्याकडे घराघरात शिवली जाते. कोंढवा गावातील अनेक महिलांच्या रोजच्या जगण्याचा भाग असलेली गोधडीच त्यांना आर्थिकदृष्टय़ा सक्षम करू शकेल, असा विचार अर्चनाने केला आणि ती कामाला लागली. अर्चना सांगते, ‘क्विल्ट कल्चर’ या नावाने कामाला सुरुवात केली तेव्हा त्याचा पसारा भविष्यात एवढा वाढेल किंवा परदेशातून आमच्या गोधडय़ांना मागणी येईल असा विचारही मनात आला नव्हता. स्थानिक महिलांना त्या करू शकतील असे काम मिळवून देणे आणि त्यातून त्यांना चार पैसे मिळावेत हाच उद्देश होता. मात्र नेहमीची गोधडी विक्रीसाठी तयार करायची तर तिचा दर्जाही चांगला हवा या विचारातून थोडय़ा नावीन्यपूर्ण रूपात गोधडी ‘डिझाईन’ केली आणि एरवी घराघरात तयार होणाऱ्या गोधडीला बघता बघता ‘ग्लोबल’ रूप प्राप्त झाले.

‘क्विल्ट कल्चर’ हा समूह तयार राहिल्यानंतर गोधडीचा दर्जा, रंग-पोत-डिझाईन कसे हवे अशा गोष्टींवर बारिक-सारिक विचार करण्यात आला. त्यादृष्टीने महिलांना प्रशिक्षण देण्यात आले. हा उद्योग महिलांना सक्षम करण्यासाठीचा असल्याने गोधडी तयार झाल्यावर तिचे ‘मार्केटिंग’ करण्यासाठी स्वतंत्र यंत्रणा उभी करणे शक्य नव्हते. तसेच गोधडी बाजारात विकायला पाठवायची तर विक्रेत्यांना त्याचे ‘कमिशन’ द्यायला हवे.

या कमिशनची रक्कम मोजावी लागली तर महिलांना त्याचा कितीसा मोबदला मिळणार? त्यामुळे केवळ फेसबुक वरील एका पेजच्या आधारे या गोधडय़ांचे मार्केटिंग करण्यास सुरुवात झाली. अनिवासी भारतीय आणि गोधडीच्या वेगळेपणाने भारावलेले अनेक परदेशी नागरिक गोधडीच्या म्हणजेच क्विल्टच्या प्रेमात पडले आणि कोंढव्यामध्ये तयार होणाऱ्या गोधडय़ा थेट परदेशात जाण्यास सुरुवात झाली. न्यूझीलंड, स्पेन, लंडन, अमेरिका अशा देशांमध्ये आता क्विल्ट पोहोचली आहे. त्या पाठोपाठ गोधडीच्या टाक्यांच्या नक्षीने सजलेल्या पर्स, लॅपटॉप बॅग, जॅकेट अशा वस्तूही परदेशी नागरिकांना भुरळ घालू लागल्या. नुकत्याच एसीएम या संस्थेच्या माध्यमातून स्टुडंटस एक्सचेंज प्रोग्रॅम अंतर्गत २० अमेरिकी विद्यार्थ्यांच्या समूहानं ‘क्विल्ट कल्चर’ला भेट दिली. गोधडी कशी तयार होते याची माहिती घेतली आणि गोधडी आणि विविध प्रकार खरेदी केले.

महाराष्ट्रातील घरांमधूनही गोधडीचा वापर कमी होत आहे. त्याच गोधडीला रंग-रुप आणि नवीन तंत्रज्ञानाची जोड दिली तर ती फक्त लोकप्रियच नव्हे तर सातासमुद्रापारही जाऊ शकते हेच ‘क्विल्ट कल्चर’ने सिद्ध केले आहे.

First Published on December 17, 2017 4:43 am

Web Title: pune quilts culture beautiful godhadis exported