एकाच महिन्यात २६३७ डब्यांच्या माध्यमातून देशभरात वाहतूक

पुणे : करोनाच्या प्रादुर्भावात सध्या आवश्यक मार्गावरच रेल्वे गाडय़ा सुरू असल्याने प्रवासी वाहतुकीतून मिळणाऱ्या उत्पन्नावर मर्यादा आल्या असताना मालवाहतुकीने रेल्वेला संजीवनी दिली आहे. पुणे रेल्वेने एप्रिलमध्ये तब्बल २६३७ डब्यांच्या माध्यमातून देशाच्या विविध भागांत वेगवेगळ्या साहित्याची वाहतूक केली आहे. त्यातून महिन्यातच १९ कोटी ५० लाख रुपयांचे उत्पन्न पुणे रेल्वेने मिळविले आहे. या वाहतुकीतून एका नव्या विक्रमाची नोंद झाली आहे.

करोनाच्या सुरुवातीच्या काळात रस्ते वाहतूकही बंद असल्याने रेल्वेने आपला मोर्चा मालवाहतुकीकडे वळविला. त्यासाठी मध्य रेल्वेने स्वतंत्र पथक कार्यरत केले. या पथकाच्या माध्यमातून अधिकाधिक व्यवसाय रेल्वेकडे आणण्यात येत आहे. त्यातून मालवाहतुकीचे नवनवे विक्रम करण्यात येत आहेत. मालवाहतुकीमध्ये खते, साखर, पेट्रोलियम पदार्थ आणि वाहनांचा प्रामुख्याने समावेश आहे.

करोनाची दुसरी लाट सध्या सुरू असताना ठरावीक आणि प्रवाशांची मागणी असलेल्या मार्गावरच रेल्वेच्या गाडय़ा सुरू आहेत. पुणे रेल्वेने एप्रिल महिन्यात २६३७ डब्यांच्या माध्यमातून देशभरात मालाची वाहतूक केली. गेल्या वर्षी याच महिन्यात करण्यात आलेल्या मालवाहतुकीपेक्षा यंदा ८८ टक्के अधिक वाहतूक करण्यात आली.  या वाहतुकीतून पुणे रेल्वेला १९ कोटी ५० लाखांचे उत्पन्न मिळाले आहे. गेल्या वर्षीच्या एप्रिल महिन्याच्या तुलनेत हे उत्पन्न १२ कोटी २० लाखांनी अधिक आहे. पुणे रेल्वेच्या व्यवस्थापक रेणू शर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली अपर व्यवस्थापक सहर्ष बाजपेयी यांच्या संयोजनाखाली व्यवसाय विकास पथकाची स्थापना करण्यात आली. या पथकासह वरिष्ठ वाहतूक व्यवस्थापक डॉ. स्वप्निल निला, वरिष्ठ वाणिज्य व्यवस्थापक सुनील मिश्रा यांच्या पथकाने संयुक्तपणे मालवाहतुकील वृद्धी आणि सुरक्षित वाहतुकीबाबत नियोजन केले.

वाहनांच्या वाहतुकीचाही मोठा आधार

पिंपरी-चिंचवड शहर तसेच चाकण आदी पट्टय़ात असलेल्या वाहन निर्मिती क्षेत्रातील कंपन्यांच्या वाहनांच्या वाहतुकीचाही मोठा आधार रेल्वेला मिळाला आहे. चिंचवड येथे या वाहतुकीच्या दृष्टीने स्वतंत्र यंत्रणा उभारण्यात आली आहे. करोनाच्या पहिल्या लाटेतील टाळेबंदीत विविध प्रकारची वाहने देशातील विविध ठिकाणीच नव्हे, तर बांगलादेश येथेही रेल्वेच्या माध्यमातून पोहोचविण्यात आली. यंदाच्या एप्रिल महिन्यात चिंचवड येथून १५ गाडय़ांच्या माध्यमातून विविध राज्यांत वाहनांची वाहतूक करण्यात आली. यापूर्वी ऑक्टोबर २०२० मध्येही १५ गाडय़ांची वाहतूक करण्यात आली होती. यंदा त्या विक्रमाची बरोबरी करण्यात आल्याचे पुणे रेल्वेकडून सांगण्यात आले.