पुणे रेल्वेच्या तिकीट निरीक्षकांनी फुकटे प्रवासी आणि योग्य प्रकारचे तिकीट न घेतलेल्या प्रवाशांवर केलेल्या कारवाईत एका दिवसात १९ लाख ६५ हजारांच्या दंडाची वसुली केली आहे. एका दिवसांत वसूल केलेला हा दंड विक्रमी ठरला आहे.
पुणे विभागात फुकटय़ा प्रवाशांबाबत सातत्याने कारवाई करण्यात येत आहे. नियमित तिकीट तपासणी बरोबरच एखाद्या गाडीत अचानकपणे तिकीट तपासणीची मोहीम हाती घेण्यात येत आहे.

या माध्यमातून फुकटय़ा प्रवाशांसह, योग्य प्रकारचे तिकीट न घेतलेले आणि साहित्याचे शुल्क न भरलेले प्रवासी मोठय़ा प्रमाणावर सापडत आहेत. त्यांच्याकडून दंडाची वसुली करण्यात येत आहे. दंड न भरल्यास कारावासाच्या शिक्षेची तरतूदही करण्यात आली आहे. तिकीट तपासणीच्या या मोहिमेमध्ये २४ ऑक्टोबरला विक्रमी दंड वसुली झाली.

पुणे विभागात या दिवशी १९ लाख ६५ हजार रुपयांच्या दंडाची वसुली करण्यात आली. यापूर्वीचा ५ नोव्हेंबर २०१८ मधील विक्रम त्यामुळे मोडीत निघाला आहे. या दिवशी १७ लाख ७० हजार रुपयांच्या दंडाची वसुली झाली होती. तिकीट तपासणीच्या या मोहिमेत आर. डी. कांबळे, एन. एन. तेलंग, बी. के. भोसले, एस. व्ही. लवांडे आणि अमोल सातपुते यांनी उत्तम कामगिरी करीत एक लाखांहून अधिक दंडाची वसुली केली. त्यामुळे विभाग व्यवस्थापक मिलिंद देऊस्कर यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला. अपर मंडल व्यवस्थापक प्रपुल्ल चंद्रा, सहर्ष बाजपेयी आदी अधिकारी उपस्थित होते. वाणिज्य व्यवस्थापक सुनील मिश्रा यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते.