सामान्य माणसांमध्ये पोलिसांबद्दल एकतर भितीयुक्त आदर तरी असतो किंवा भितीयुक्त राग तरी असतो. पण हेच पोलीस आपल्या सुरक्षेसाठी, आपल्या सुविधेसाठी कायम तत्पर असतात हेही अनेक घटनांमधून वेळोवेळी समोर येतच असतं. लोणावळ्यामध्ये नुकतीच अशीच एक घटना घडली असून एका जखमी महिलेला वाचवण्यासाठी लोहमार्ग पोलिसांनी तिला झोळीत घेऊन चक्क ४ किलोमीटरपर्यंत पायपीट केल्याची घटना समोर आली आहे. या पोलिसांच्या प्रयत्नांना देखील यश आलं असून संबंधित महिलेची प्रकृती स्थिर असल्याची माहिती रुग्णालयाकडून देण्यात आली आहे. या लोहमार्ग पोलिसांचा महिलेला झोळीत घालून नेतानाचा फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे!

नेमकं झालं काय?

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आशा दाजी वाघमारे या ४२ वर्षीय महिला पिंपरी-चिंचवडच्या थेरगाव येथील रहिवासी आहेत. त्या सोमवारी सकाळी लोणावळ्याजवळच्या जांबरूंग रेल्वे स्टेशनपासून काही अंतरावर रेल्वे ट्रॅक ओलांडत होत्या. मात्र, उलट्या बाजूने येणाऱ्या रेल्वेचा त्यांना अंदाज आला नसावा. त्यामुळे त्यांना रेल्वेची धडक बसली आणि त्या बाजूला पडल्या.

या धक्क्यामुळे आशा वाघमारे यांच्या मणक्याला जबर मार लागला होता. त्यामुळे त्यांना उठून उभं राहाणं देखील शक्य होत नव्हतं. तोपर्यंत पुणे लोहमार्ग पोलिसांना या घटनेची माहिती मिळाली होती. त्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. पोलीस तिथे पोहोचले खरे, मात्र आसपास कुठेही रुग्णवाहिका उपलब्ध होण्याची शक्यता नव्हती. त्यामुळे घटनास्थळापासून थेट पळसदरी रेल्वे स्थानकापर्यंत महिलेला नेणं क्रमप्राप्त होतं. तिथे रुग्णवाहिका उपलब्ध होऊ शकली असती. अशा वेळी पोलिसांनी महिलेला रुग्णवाहिकेपर्यंत पोहचवण्याचा निर्धार केला.

ससून रुग्णालयात महिलेवर उपचार!

जवळच मिळालेल्या एका चादरीची त्यांनी झोळी केली. बाजूच्या एका लाकडी ओंडक्याला ती झोळी त्यांनी बांधली. आणि तब्बल चार किलोमीटरपर्यंतचं अंतर पायी चालत पळसदरी रेल्वे स्थानक गाठलं. रेल्वे स्थानकाबाहेर उभ्या असलेल्या रुग्णवाहिकेत आशा वाघमारे यांना झोपवलं आणि मगच सुटकेचा नि:श्वास सोडला.

धक्कादायक! कुत्र्याला फुगे बांधून हवेत उडवलं; व्हिडीओ युट्यूबला शेअर केल्यानंतर संताप

दरम्यान, रेल्वे पोलिसांच्या या प्रयत्नांना यश आलं. आशा वाघमारे यांना रुग्णवाहिकेतून पुण्यातील ससून रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. वेळीच उपचार मिळाल्यामुळे त्यांचा जीव तर वाचलाच, पण त्यासोबतच त्यांची प्रकृती देखील आता स्थिर आहे.