दिवाळी सुटी, हिवाळी पर्यटनालामागणी; तत्काळ तिकिटे, जादा गाडय़ांकडे आता लक्ष

पुणे रेल्वे स्थानकावरून देशाच्या विविध भागात जाणाऱ्या गाडय़ाचे जवळपास या वर्षअखेरीपर्यंतचे आरक्षण फुल्ल झाले आहे. दिवाळी सुटी आणि डिसेंबरमध्ये देशाच्या विविध भागामध्ये पर्यटनाला जाणाऱ्या प्रवाशांची मागणी मागणी वाढल्याने सर्वच गाडय़ांना आता भलेमोठी प्रतीक्षायादी आहे. त्यामुळे प्रवाशांची वाढणारी संख्या पाहता रेल्वेच्या वतीने सोडण्यात येणाऱ्या जादा गाडय़ा आणि तत्काळ तिकिटांवर प्रवाशांचे लक्ष लागले आहे.

पुणे आणि परिसरातील लोकसंख्या वाढत असताना पुण्यातून देशाच्या विविध ठिकाणी रेल्वेने जाणाऱ्या प्रवाशांची संख्याही मागील काही वर्षांमध्ये वाढली आहे. पुणे स्थानकात दररोज दोनशेच्या आसपास गाडय़ांची ये-जा असते. मात्र, प्रवाशांची वाढती संख्या लक्षात घेता सातत्याने गाडय़ांची कमतरता जाणवते. सुटय़ा व सणांच्या कालावधीत गाडय़ांचे आरक्षण मिळविणे जिकिरीचे ठरते. रेल्वेच्या नियमानुसार १२० दिवस आधी गाडीचे आरक्षण करता येते. दिवाळीच्या सुटीसाठी प्रवाशांनी मोठय़ा प्रमाणावर आरक्षण केल्याचे दिसून येत आहे. सकाळी आठला ऑनलाइन आरक्षण सुरू झाल्यानंतर काही वेळातच ‘वेटिंग’ सुरू होते. ही स्थिती आजही कायम आहे. त्यामुळे पुणे स्थानकावरून सुटणाऱ्या सर्वच गाडय़ा डिसेंबपर्यंत फुल्ल झाल्या आहेत.

प्रवाशांच्या गर्दी

  • जोधपूर, जयपूर, गोरखपूर, लखनऊ, दरभंगा, पटना, इंदूर, नागपूर, जम्मुतावी या गाडय़ांसह पुणे-निजामुद्दीन दुरंतो, पुणे-हावडा दुरंतो, पुणे-अहमदाबार दुरंतो या गाडय़ांना प्रवाशांकडून मोठय़ा प्रमाणावर मागणी आहे.
  • प्रामुख्याने उत्तरेकडे जाणाऱ्या गाडय़ांना बाराही महिने मोठय़ा प्रमाणावर प्रवासी असतात.
  • दिवाळीच्या सुटीमध्ये उत्तरेकडे जाणाऱ्या प्रत्येक गाडय़ांना हजाराच्याही पुढे प्रतीक्षा यादी आहे. त्यामुळे या प्रवाशांची मागणी पूर्ण करण्याचे आव्हान रेल्वेपुढे उभे आहे.
  • प्रतीक्षा यादी वाढतच असल्याने काही मार्गावर विशेष किंवा अतिरिक्त गाडय़ा सोडण्याचे नियोजन करण्यात आले आहे. त्यामुळे या गाडय़ांकडे प्रवाशांचे लक्ष लागले आहे.
  • त्याचप्रमाणे दिवाळीच्या काळातील गाडय़ांच्या तत्काळ तिकिटासाठीही तिकीट खिडक्यांवर मोठी गर्दी लोटणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

रेल्वेचे ऑनलाइन तिकीट सकाळी आठला सुरू होते आणि क्षणार्धात संपते. एका व्यक्तीला बारा तिकिटे काढता येत असल्याने ही स्थिती आहे. पुणे व िपपरी-चिंचवड शहर, मावळ परिसर, दोन कॅन्टोन्मेंट विभाग, पुणे ते दौंडपर्यंतचा पट्टा, बारामती परिसर आदी प्रवासी पुणे स्थानकावरून सुटणाऱ्या गाडय़ांवर अवलंबून आहेत. त्या तुलनेत गाडय़ांची संख्या कमी असल्याने प्रवाशांची गैरसोय होते आहे.

– हर्षां शहा, अध्यक्षा, रेल्वे प्रवासी ग्रुप