स्वच्छता अभियानांतर्गत रेल्वेच्या पुणे विभागांतर्गत स्थानकाच्या स्वच्छतेची विशेष मोहीम राबविण्यात येत असताना त्यात विविध सेवाभावी संस्थांचाही सहभाग घेण्यात येत आहे. याच मोहिमेअंतर्गत शनिवारी निरंकारी चॅरिटेबल ट्रस्टच्या बाराशे सेवकांनी पुणे स्थानकाच्या परिसरात स्वच्छता करून स्थानकाचे आवार चकाचक केले.
पुणे स्थानकाच्या परिसरात मागील काही दिवसांपासून स्वच्छतेबाबत विशेष लक्ष पुरविण्यात येत आहे. स्वच्छतेच्या कामाची सीसीटीव्ही यंत्रणेच्या माध्यमातूनही तपासणी करण्यात येते. स्वच्छतेच्या कामासाठी रेल्वेच्या व्यवस्थेसह इतर सेवाभावी संस्थांनाही सहभागी करून घेतले जात आहे. निरंकारी चॅरिटेबल ट्रस्टच्या सुमारे बाराशे सेवकांनी सकाळी आठपासून स्वच्छतेच्या कामाला सुरुवात केली. स्थानकाच्या परिसरातील प्रत्येक ठिकाण या सेवकांनी स्वच्छ केले.
रेल्वेच्या पुणे विभागाचे व्यवस्थापक बी. के. दादाभोय, सहव्यवस्थापक मिलिंद देऊस्कर, वाणिज्य व्यवस्थापक गौरव झा, सहायक वाणिज्य व्यवस्थापक संजय कुमार, वरिष्ठ स्थानक व्यवस्थापक ए. के. पाठक, निरंकारी फाऊंडेशनचे ताराचंद करमचंदानी, सेवादल संचालक किसनलाल अडवानी, अशोक अहुजा, प्रल्हाद फंड आदींच्या नेतृत्वाखाली ही मोहीम राबविण्यात आली.