रात्री बारानंतरही कोंडी; अ‍ॅप आधारित मोटारींचा वेढा

पुणे रेल्वे स्थानक भागातील वाहतुकीचा बट्टय़ाबोळ झाला असून मध्यरात्रीनंतरही या भागात वाहतूक कोंडी झाल्याचे दृश्य सध्या पाहायला मिळत आहे. उन्हाळी सुट्टीत मोठय़ा संख्येने परगावाहून येणारे तसेच परगावी जाणारे नागरिक  रात्री रेल्वे स्थानक परिसरात येतात. त्यामुळे प्रवाशांची ने-आण करण्यासाठी अ‍ॅप आधारित मोटारींचा वेढा रेल्वे स्थानक परिसराला पडत असल्याने कोंडीत भर पडते. त्यामुळे रेल्वे स्थानक परिसरातील वाहतूक मध्यरात्रीपर्यंत विस्कळीत असते.

उन्हाळी सुट्टीत परगावाहून मोठय़ा संख्येने प्रवासी पुण्यात येतात तसेच अनेकजण पर्यटनासाठी बाहेरगावी जातात. काही रेल्वेगाडय़ा रात्री उशिरा पुणे रेल्वे स्थानकात येतात. प्रवाशांनी ने-आण करणाऱ्या अ‍ॅप आधारित मोटारी या भागात थांबतात. पुणे रेल्वे स्थानकाच्या प्रवेशद्वार क्रमांक एकपासून या मोटारींची रांग लागते. या भागात प्रवाशांना घेऊन येणाऱ्या मोटारी स्थानकात प्रवेश करतात. त्यामुळे गेल्या काही महिन्यांपासून या भागात मध्यरात्रीपर्यंत कोंडी होते. मोटारींची रांग स्थानकातील सर्व प्रवेशद्वारांजवळ आल्याने बाहेरगावाहून येणाऱ्या प्रवाशांना कोंडीतून वाट काढत पुढे जावे लागते.

रात्री बारानंतरही या भागात कोंडी असते. काही मोटारचालक तासन् तास या भागात थांबत असल्याने कोंडीत भर पडते. रात्री उशिरा या भागात वाहतूक पोलीस नसल्याने वाहतुकीचा बट्टय़ाबोळ होतो. त्यामुळे या भागात किरकोळ वादावादीचे प्रसंग घडतात. कोंडीत वाजणाऱ्या हॉर्नमुळे प्रवासी त्रासून जातात. लहान मुलांना घेऊन गर्दीतून वाट काढणाऱ्या प्रवासी विशेषत: महिला आणि ज्येष्ठ नागरिकांना त्रासाला सामोरे जावे लागते. रेल्वे स्थानकाच्या आवारात देखील रात्री उशिरा पोलीस नसल्याने वाहतूक व्यवस्था कोलमडून पडते. उन्हाळी सुट्टीत या भागातील कोंडीत भर पडते.

पुणे रेल्वे स्थानक भागात महापालिकेचा वाहनतळ आहे. वाहन तळावर मोटारी लावण्याची सोय उपलब्ध असताना अनेकजण पुणे रेल्वे स्थानक परिसरातील मुख्य प्रवेशद्वारासह वेगवेगळ्या भागात मोटारी घेऊन थांबतात. त्यामुळे या भागातील कोंडीत भर पडते. मोटारचालकांनी वाहनतळाचा वापर केल्यास या भागात कोंडी होणार नाही. यापुढील काळात प्रवेशद्वाराच्या बाहेर वाहतुकीला अडथळा ठरणाऱ्या मोटार तसेच वाहनांवर कारवाई करण्यात येईल.    – पंकज देशमुख, पोलीस  उपायुक्त, वाहतूक विभाग

खिसेकापू, चोरटय़ांचा वावर

पुणे रेल्वे स्थानकाच्या आवारात मोठी गर्दी होते. गर्दीत खिसेकापू, चोरटय़ांचा वावर असतो. अनेकांचे मोबाइल संच तसेच पिशवीतील मौल्यवान ऐवज लांबविण्याच्या घटना घडतात. उन्हाळी सुट्टीत अशा प्रकारच्या घटना वाढल्या आहेत. रेल्वे स्थानकाच्या आवारातील वाहतुकीला शिस्त लावण्यासाठी लोहमार्ग पोलीस तसेच रेल्वे सुरक्षा दलाने (आरपीएफ) तातडीने उपाययोजना करण्याची गरज निर्माण झाली आहे.