राज्याचा ६.४१ टक्के, तर पुण्याचा १० टक्के 

पुणे : राज्यासह देशभरात करोना विषाणू संसर्गाने गंभीर स्वरूप धारण केलेले असतानाच राज्यातील करोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूचा सर्वाधिक दर पुण्यात असल्याचे स्पष्ट झाले आहे. पुणे, पिंपरी चिंचवड आणि पुणे जिल्ह्य़ात बुधवारी संध्याकाळपर्यंत ४२७ रुग्णांची नोंद झाली, त्यांपैकी ४३ रुग्णांचा या आजारात  मृत्यू झाला. त्यामुळे पुण्याचा मृत्युदर राज्यात सर्वाधिक म्हणजे, १०.०७ टक्के असल्याचे स्पष्ट झाले आहे.

आठ मार्चला दुबईहून परतलेल्या पुणेकर दाम्पत्याला करोना विषाणू संसर्ग झाल्याचे दिसून आले. करोनाचा संसर्ग झालेले हे महाराष्ट्रातील पहिले रुग्ण होते. १४ दिवसांच्या संपूर्ण विलगीकरण आणि उपचारांनंतर हे रुग्ण बरे होऊन घरी परतले. मात्र, दरम्यानच्या काळात मुंबई आणि पुण्यात रुग्ण आढळण्याचा वेग वाढीस लागला. बुधवारी संध्याकाळपर्यंत मुंबईमध्ये एकूण १७५३ रुग्ण आढळले, तर पुणे, पिंपरी आणि पुणे जिल्ह्य़ात ४२७ रुग्ण आढळले. रुग्ण आढळण्याचा मुंबईचा वेग सर्वाधिक असला तरी त्यातुलनेत तेथील मृत्युदर कमी आहे. बुधवारी संध्याकाळपर्यंत मुंबईत १११ रुग्ण करोना विषाणू संसर्गाने दगावले.  मुंबईचा मृत्युदर पुण्याच्या तुलनेत कमी म्हणजे ६.३३ टक्के एवढा असल्याचे दिसून आले आहे. बुधवारी संध्याकाळी नोंद झालेली महाराष्ट्रातील रुग्णांची संख्या २,९१६ आहे. त्यांपैकी १८७ रुग्ण राज्यात दगावले आहेत. त्यामुळे राज्यातील मृत्युदर ६.४१ टक्के आहे.

ससूनमध्ये बहुतांश रुग्ण अखेरच्या टप्प्यात उपचारांसाठी दाखल

पुण्यातील सर्वाधिक मृत्यू ससून सवरेपचार रुग्णालयात झाल्याचे दिसून आले आहे. बुधवापर्यंत दगावलेल्या ४३ मृतांपैकी सर्वाधिक ३४ मृत्यू ससून रुग्णालयात झाले. रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. चंदनवाले म्हणाले,की बहुतांश रुग्ण हे अखेरच्या टप्प्यात उपचारांसाठी ससूनमध्ये येत आहेत. यातील सर्वाधिक रुग्ण मधुमेह, हृदयविकार, उच्च रक्तदाब, अस्थमा, स्थूलता अशा आजारांनी ग्रासलेले आहेत. प्रकृती अतिशय गंभीर झाल्यानंतर हे रुग्ण ससूनपर्यंत येतात, त्यामुळे महत्त्वाच्या टप्प्यात रुग्णाला वाचवण्यासाठी जे उपचार करावे लागतात, ते करण्याची वेळ हातातून निघून गेलेली असते. ससून रुग्णालयात करोना विषाणू संसर्गाचे रुग्ण सामावून घेण्यासाठी सर्व यंत्रणा सज्ज आहे, मात्र रुग्ण उशिरा आले असता, रुग्णालय आणि डॉक्टरांच्या हातात काहीही नसते. त्यामुळे सर्व रुग्णांना आवाहन आहे, की दुखणे अंगावर न काढता नजीकच्या हिवताप रुग्णालयात उपचारांसाठी या, तेथील तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घ्या. त्यामुळे उपचारांसाठी विलंब होणे टाळता येईल.

शहरात ६९ नवे रुग्ण; चार जणांचा मृत्यू

पुणे : पुणे शहरातील ६५ तर पिंपरी-चिंचवड शहरातील चार नागरिकांना नव्याने करोना विषाणूची लागण झाल्याचे गुरुवारी आढळले. या व्यतिरिक्त बुधवारी रात्री उशिरा १० नव्या रुग्णांची नोंद झाली होती, त्यामुळे पुणे, पिंपरी आणि परिसरातील रुग्णांची संख्या ५०६ झाली आहे.

विभागीय आयुक्त कार्यालयाकडून गुरुवारी सायंकाळी याबाबतची माहिती प्रसिद्धीस देण्यात आली. पुणे शहरात नव्या ६५ रुग्णांची नोंद झाली. तर पिंपरीत नव्याने चार रुग्ण आढळले. चारही नवे रुग्ण एका करोनाबाधित रुग्णाच्या संपर्कात आलेले आहेत. त्यांमध्ये चार वर्षीय चिमुरडी, तिची आई, अन्य एक महिला आणि पुरुष यांचा समावेश आहे.

पुणे शहरातील चार रुग्णांचा गुरुवारी दिवसभरात मृत्यू झाला. वाकडेवाडी येथील ६५ वर्षीय महिला, गंजपेठेतील ५४ वर्षीय पुरुष, कोंढवा आणि गुलटेकडी येथील अनुक्रमे ४७ आणि ५५ वर्षीय महिला यांचा मृतांमध्ये समावेश आहे. या सर्व मृतांना गुंतागुंतीच्या आजारांची पाश्र्वभूमी होती. त्यामुळे पुणे, पिंपरी आणि परिसरातील मृतांची संख्या ४७ झाली आहे.

पुणे महापालिका कार्यक्षेत्रातून ३० तर पिंपरी-चिंचवड महापालिका क्षेत्रातून १२ रुग्णांना संपूर्ण बरे वाटल्यानंतर घरी सोडण्यात आले आहे. यांमध्ये ससून रुग्णालयात ३१ मार्चला उपचारांसाठी दाखल झालेल्या ४२ वर्षीय रुग्णाचा समावेश आहे. ससून रुग्णालयातून करोनामुक्त झालेला हा पहिला रुग्ण आहे.