पुणे : शहरातील पावसाळी स्थिती निवळल्यानंतर पुन्हा एकदा तापमानात वाढ सुरू झाली असून, मंगळवारी (५ मे) शहराच्या तापमानाचा पारा चाळिशीपार गेला. उन्हाचा चटका वाढण्याबरोबरच उकाडय़ातही मोठी वाढ झाली आहे. आठवडाभर शहरातील तापमानाचा पारा चढा राहणार असल्याचा अंदाज पुणे वेधशाळेकडून व्यक्त करण्यात आला आहे. पुणे शहर आणि परिसरामध्ये गेल्या आठवडय़ात पावसाळी स्थिती निर्माण झाली होती. या कालावधीत शहरात जोरदार पावसाने हजेरी लावली. २३ मे पर्यंत शहरात दुपारनंतर आकाशाची स्थिती ढगाळ होती. सध्या निरभ्र आकाशाची स्थिती आणि कोरडे हवामान निर्माण झाले आहे. परिणामी दिवसाच्या कमाल तापमानाचा पारा वाढतो आहे. एप्रिल महिन्याच्या शेवटच्या टप्प्यात शहरातील तापमानाचा पारा ४० अंश सेल्सिअसवर गेला होता. त्यानंतर आता पुन्हा तापमान चाळीस अंश सेल्सिअसच्या पुढे गेले आहे.

शहरात मंगळवारी ४०.३ अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली. सरासरीच्या तुलनेत हे तापमान २.६ अंशांनी अधिक आहे.

त्यामुळे दुपारी चांगलाच उकाडा जाणवत होता. त्यामुळे घरात पंखे आणि वातानुकूलित यंत्रांचा वापर वाढवावा लागला. रात्रीच्या किमान तापमानात मात्र काही प्रमाणात घट होऊन ते मंगळवारी १९.५ अंशांवर आले. त्यामुळे रात्रीचा उकाडा काहीसा कमी झाला असला, तरी तो आठवडय़ात वाढणार आहे. त्याचप्रमाणे दिवसाच्या कमाल तापमानाचा पाराही चढा राहणार आहे.