संकेतस्थळावरून वर्षांला ८६० कोटी रुपयांचा वीजबिल भरणा
महावितरण कंपनीने संकेतस्थळाच्या माध्यमातून ऑनलाईन वीजबिल भरण्याची सुविधा उपलब्ध करून दिल्यापासून पुणेकरांनी या सोप्या व वेळ वाचविणाऱ्या पर्यायाला मोठा प्रतिसाद दिला आहे. वर्षभरामध्ये पुणेकरांनी ऑनलाईनच्या माध्यमातून ८६० कोटी रुपयांचा वीजबिल भरणा करून राज्यात आघाडी घेतली आहे. त्याचप्रमाणे २०१५-१६ या आर्थिक वर्षांत राज्यभरातील महावितरणच्या ग्राहकांनी ३४८२ कोटी ५८ लाख रुपये वीजबिल ऑनलाईन पद्धतीने भरले आहे.
ऑनलाईन वीजबिल भरण्याची पद्धती अत्यंत सुलभ असल्याने व घरबसल्या कुठूनही वीजबिलाचा भरणा करता येत असल्याने या सुविधेकडे वीजग्राहक मोठय़ा प्रमाणावर आकर्षित होत आहेत. महावितरणने इंटरनेटच्या माध्यमातून http://www.mahadiscom.in या संकेतस्थळावर लघुदाब वीजग्राहकांसाठी ऑनलाईन वीजबिल भरण्याची सुविधा दिली आहे. त्याचप्रमाणे मोबाइल अ‍ॅपच्या माध्यमातूनही बिल भरता येत असून, त्यालाही ग्राहकांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. ऑनलाईन वीजबिल भरण्यात पुण्यापाठोपाठ भांडूप व कल्याण परिमंडल आघाडीवर आहेत. या तीन विभागात ऑनलाईन वीजबिलाच्या रकमेत २०१५- १६ या आर्थिक वर्षांत सुमारे अडीचशे ते तीनशे कोटींनी वाढ झाली आहे.
पुणे परिमंडलात वर्षभरात ८६० कोटी, भांडूप परिमंडलात ७४७ कोटी, तर कल्याण परिमंडलात ऑनलाईनद्वारे ५५१ कोटी रुपयांना भरणा वीजग्राहकांनी केला आहे. नाशिक परिमंडलात २७१ कोटी, नागपूर परिमंडलात ११८ कोटी, कोल्हापूर परिमंडलात १३५ कोटी, बारामतीत १५१ कोटी व औरंगाबाद परिमंडलात १२५ कोटी रुपयांचा वीजबिलचा भरणा ऑनलाईन पद्धतीने झाला. ऑनलाईन वीजबिल भरणासह ई-मेलद्वारे वीजबिलाची सेवाही महावितरणने उपलब्ध केली आहे. यात छापील कागदाऐवजी गो-ग्रीन अंतर्गत वीजबिलाच्या ई-मेलचा पर्याय स्वीकारल्यास दरमहा तीन रुपये सूट दिली जाते. छापील कागदासह ई-मेलद्वारे वीजबिल मिळविण्याचीही सोय आहे. त्याची माहिती महावितरणच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आली आहे.
वीजबिलाचा ऑनलाईन भरणा करण्यासाठी क्रेडिट,डेबिट किंवा नेटबँकिंगचा पर्याय उपलब्ध आहे. वीजबिलाची मुदत संपल्यानंतरही बिलंब शुल्काच्या रकमेसह बिल भरता येते. मात्र, मुदतीनंतर भरलेल्या बिलाची पावती महावितरणच्या संबंधित कार्यालयात दाखविणे आवश्यक आहे. मोबाइल अ‍ॅपद्वारेही वीजबिल भरणे शक्य असून, राज्यभरात दोन लाखांहून अधिक ग्राहक त्याचा लाभ घेत आहेत. या सुविधेसह ऑनलाईन पद्धतीचा जास्तीत जास्त ग्राहकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन महावितरण कंपनीकडून करण्यात आले आहे.