नोटा रद्द करण्याच्या निर्णयानंतर एखाद्या एटीएम केंद्रात पैसे आले आहेत असे समजले, की त्या केंद्राबाहेर रांगा लागतात. त्या शिवाय बँकांमध्येही रांगा कायम आहेत. या रांगामध्ये उभ्या राहिलेल्या नागरिकांमध्ये जी चर्चा सुरू असते त्यातून अनेक विषय छेडले जातात. कोणी या निर्णयावर टीका करत असतात, तर कोणी स्वागत करतात. शिवाय सद्यपरिस्थितीमुळे काय काय अडचणी येत आहेत, याबाबतही नागरिक मते व्यक्त करत असतात. शहराच्या विविध भागातील रांगांमध्ये शुक्रवारी जी चर्चा ऐकायला मिळाली ती नागरिकांच्याच शब्दांत..

[jwplayer eW0sv8sU]

‘आम्हाला याआधी आमचे निवृत्तीवेतन घेण्यासाठी इतका वेळ ताटकळत बँकेत कधीच उभे राहावे लागले नाही. बँकेत येताच काम होत असे.’ ‘आमच्या घरात लग्न आहे. लग्नाची खरेदी करण्यासाठी आम्ही चार नोव्हेंबरला बँकेतून पैसे काढले होते. जास्त रक्कम असल्यामुळे बँकेने पाचशे आणि हजाराच्या नोटा दिल्या. खरेदी करून आता उरलेल्या नोटा बँकेत परत करण्यासाठी आम्ही नवरा-बायको दोघही काम सोडून रांगेत उभे आहोत.’ ‘मोदींनी निर्णय चांगला घेतला हो. पण या बँकवाल्यांच्या कामचुकारपणामुळेच नागरिकांना त्रास होतोय,’ अशा विविध प्रतिक्रिया कानी पडत आहेत.

‘या अगोदर एटीएममधून दोन मिनिटांत पैसे मिळत होते. पण आता दिवसभर रांगेत उभे राहावे लागते, तरीही पैसे मिळण्याची खात्री नसते.’ ‘बँकेने नेमलेल्या सुरक्षारक्षकांना चांगलीच कामं लागली आहेत. नाही तर बँकेच्या गार हवेत नुसते बसून राहत होते.’ ‘वरूनच पैसा पाठवला नसेल, तर बँक तरी कुठून देणार आपल्याला आणि पाठवले असतील तरी पुढाऱ्यांनी आपल्या अगोदर घेतले असतील.’

‘नवीन दोन हजारांची नोट मिळून पण काही फायदा नाही. बाजारात गेल्यावर ती कोणीच घेत नाही. कशी घेणार शंभर-दोनशे रुपयांच्या खरेदीसाठी विक्रेत्याने एवढे सुट्टे पैसे कुठून आणायचे?’ असे संवाद सर्वत्र कानी पडत आहेत. ‘इच्छा नसतानाही पाचशे रुपयांचे पेट्रोल गाडीत भरावे लागते. पेट्रोल पंपावरही सुटे पैसे देत नाहीत आणि दोन हजारांची नोट स्वीकारत नाहीत,’ अशा शब्दांत नाराजी व्यक्त होत आहे.

[jwplayer xpbAHLf3]