06 March 2021

News Flash

पुणे रेल्वे स्थानक इमारत.. वय वर्षे नव्वद!

ऐतिहासिक वारसा असलेल्या रेल्वे स्थानकाच्या इमारतीला सोमवारी तब्बल नव्वद वर्षे पूर्ण झाली.

| July 28, 2015 03:25 am

मुंबईमध्ये भारतातील पहिली रेल्वे धावल्यानंतर पुढील पाच ते सहा वर्षांतच पुण्याची रेल्वे सुरू झाली.. पुणे हे लष्कराचे प्रमुख ठाणे असल्याने ब्रिटिशांनी पुण्यातील रेल्वेसाठी विशेष लक्ष दिले.. त्यातूनच रेल्वे स्थानकासाठी विशेष रचनेची एक देखणी इमारत उभी राहिली व मोठय़ा दिमाखात तिचे उद्घाटन झाले, तो दिवस होता २७ जुलै १९२५.. ऐतिहासिक वारसा असलेल्या या इमारतीला सोमवारी तब्बल नव्वद वर्षे पूर्ण झाली. स्थानकात दररोज ये-जा करणाऱ्या वीस गाडय़ांपासून २३० गाडय़ांपर्यंतचा प्रवास या इमारतीने अनुभवला आहे.
पुणे स्थानकाच्या इमारतीचा पहिला आराखडा पी. विल्सन यांच्या मार्गदर्शनाखाली १९१५ मध्ये तयार करण्यात आला होता. त्यानंतर १९२२ मध्ये इमारतीचे काम सुरू करण्यात आले. पुढील तीनच वर्षांत मुख्य अभियंता जेम्स बेर्कक्ले यांच्या नियोजनाखाली बांधकाम पूर्ण झाले. इमारतीचे उद्घाटन मुंबईचे गव्हर्नर सर लेस्ली विल्सन यांच्या उपस्थितीत करण्यात आले. या समारंभासाठी मुंबईहून एक विशेष रेल्वे करण्यात आली होती. ही इमारत बांधण्यासाठी त्या वेळी पाच लाख ७९ हजार ६६५ रुपये इतका खर्च आला होता. पुणे स्थानकाच्याच आराखडय़ानुसार लाहोर रेल्वे स्थानकाची इमारतही उभारण्यात आली.
पुण्याच्या इमारतीला काही वर्षांपूर्वी मॉडेल रेल्वे स्थानक म्हणूनही मान्यता मिळालेली आहे. त्याचप्रमाणे या इमारतीला ऐतिहासिक वास्तूचा दर्जाही मिळालेला आहे. इमारतीच्या उद्घाटनानंतर १९२९ मध्ये पुणे स्थानकावरून विजेवरील रेल्वे धावली. १९३० मध्ये जागतिक कीर्तीची डेक्कन क्वीन गाडी सुरू झाली. आशिया खंडातील पहिली डबल डेकर सिंहगड एक्स्प्रेसही त्याच दरम्यान सुरू झाली. अशा अनेक गोष्टींचा व रेल्वेच्या वाढत्या व्यापाची साक्षीदार असलेल्या या इमारतीने नव्वद वर्षे पूर्ण करून आता ९१ व्या वर्षांत पदार्पण केले आहे. पानशेतचा पूर, कोयनेचा भूकंप असे विविध धक्केही या इमारतीने अनुभवले आहेत.
स्थानकाच्या इमारतीचाच नव्हे, पुणे स्थानकाचा संपूर्ण इतिहास तोंडपाठ असलेल्या रेल्वे प्रवासी ग्रुपच्या अध्यक्षा हर्षां शहा या दरवर्षी इमारतीचा वाढदिवस साजरा करतात. इमारतीचा सहस्रचंद्रदर्शन सोहळाही त्यांनी मोठय़ा दिमाखात साजरा केला होता. पुणे स्थानकावरील भार आता वाढतो आहे. त्यामुळे इमारतीचा हा ऐतिहासिक वारसा जपण्याबरोबरच स्थानकाची क्षमता वाढविण्याची गरज निर्माण झाली आहे. त्यानुसार पुढील काळात स्थानकाचा कायापालट होणे गरजेचे आहे, असे मत शहा यांनी व्यक्त केले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 28, 2015 3:25 am

Web Title: pune rly station in 90s
Next Stories
1 पुण्यामधील धरणांचा साठा ३९ टक्क्य़ांवर
2 पुण्यात रात्रीच्या हॉटेल्सच्या वेळा मुंबईप्रमाणे कराव्यात
3 पवना बंदनळ योजनेसाठी पालकमंत्र्यांनी हस्तक्षेप करावा – अजित पवार
Just Now!
X