29 September 2020

News Flash

आरटीओच्या कागदपत्रांचा नागरिकांना बटवडा करण्यात टपाल खाते अपयशी

टपाल खात्याच्या अपयशामुळे संबंधित कागदपत्र नागरिकाला स्वहस्ते घेऊन जाण्याची व्यवस्था करावी

सर्वानाच स्वहस्तेच कागदपत्र देण्याची मागणी

वाहन नोंदणी व नूतनीकरणाची कागदपत्रं, त्याचप्रमाणे वाहन चालविण्याचा परवाना टपाल खात्यामार्फत नागरिकांना पाठविण्यात येतो, मात्र संबंधित कागदपत्र वेळेवर मिळत नसल्याचा तक्रारी लक्षात घेता या बटवडय़ात टपाल खाते अपयशी झाल्याचे स्पष्ट झाले आहे. याचा परिणाम म्हणून परिवहन प्रवर्गातील वाहनांची कागदपत्रे स्वहस्ते घेऊन जाण्याची मुभा परिवहन खात्याने नुकतीच दिली आहे. मात्र, सर्वच नागरिकांना आरटीओशी संबंधित त्यांची कागदपत्रे स्वहस्ते घेऊन जाण्याची मुभा द्यावी, अशी मागणी महाराष्ट्र राज्य मोटार ड्रायव्हिंग असोसिएशनने केली आहे.

आरटीओकडून नागरिकांना देण्यात येणारी कागदपत्रे टपाल विभागामार्फत पाठविण्यासाठी अतिरिक्त शुल्क घेण्यात येते. मात्र मागील काही दिवसांपासून ही कागदपत्रे वेळेत नागरिकांपर्यंत पोहोचतच नसल्याचे दिसून येते. आठ दिवसात घरपोच परवाना किंवा इतर कागदपत्र येणे अपेक्षित असताना अनेकदा दोन ते तीन महिने ती मिळतच नसल्याचा अनुभव आहे. अनेकांचे परवाने टपाल खात्यातच पडून असतात. आरटीओ व टपाल कार्यालयात वेळोवेळी चकरा मारून परवाना मिळवावा लागतो. या प्रक्रियेमुळे नागरिकांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागतो.

टपाल खात्याच्या अपयशामुळे संबंधित कागदपत्र नागरिकाला स्वहस्ते घेऊन जाण्याची व्यवस्था करावी, अशी मागणी मोटार ड्रायव्हिंग असोसिएशनने मागे केली होती. त्याचा परिणाम म्हणून परिवहन संवर्गातील माल व प्रवासी वाहतुकीतील वाहनांची कागदपत्रं, आधार कार्डचा पुरावा दाखवून स्वहस्ते घेऊन जाण्याची मुभा देण्यात आली आहे. स्वहस्ते कागदपत्र घेतली, तरी पन्नास रुपयांचे बटवडा शुल्क आकारण्यात येत आहे.

असोसिएशनचे अध्यक्ष राजू घाटोळे याबाबत म्हणाले, की स्वहस्ते कागदपत्र देण्यात येणार असल्याने त्यासाठी बटवडा शुल्क घेणे योग्य नाही.

केवळ परिवहन प्रवर्गातीलच नव्हे, तर सर्व नागरिकांना त्यांची कागदपत्रे स्वहस्ते घेण्याची परवानगी द्यावी व ओळखीचा पुरावा म्हणून केवळ आधार कार्ड नव्हे, तर इतरही पुरावे ग्राह्य धरण्यात यावीत, अशी आमची मागणी आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 28, 2016 2:55 am

Web Title: pune rto document issue
Next Stories
1 चार सदस्यांच्या प्रभागावर शिक्कामोर्तब
2 पूर्ववैमनस्यातून सराईत गुन्हेगाराचा खून
3 ज्येष्ठ समीक्षक प्रा. रा. ग. जाधव यांचे निधन
Just Now!
X