प्रादेशिक परिवहन कार्यालयीतील (आरटीओ) कामकाज अधिकाधिक सुलभ व अत्याधुनिक करण्याच्या दृष्टीने पुणे कार्यालयात आठ दिवसांपासून नवी संगणकप्रणाली सुरू करण्यात आली. मात्र, यात तांत्रिक अडचणी निर्माण होत असल्याने आणि त्या सोडविण्यासाठी कोणताही सक्षम तंत्रज्ञ नसल्याने कामकाज सुलभ होण्याऐवजी ते अधिकच किचकट झाले आहे. त्यामुळे नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.

परिवहन कार्यालयातील कामकाजासाठी दिल्ली येथे वापरण्यात येत असलेली ४.० ही संगणकप्रणाली पुणे कार्यालयात बसविण्यात आली आहे. ही प्रणाली सुरू करण्यासाठी सात दिवस आरटीओतील विविध कामे बंद ठेवण्यात आली होती. मागील आठ दिवसांपासून या प्रणालीच्या माध्यमातून आरटीओचे काम सुरू करण्यात आले आहे. अत्याधुनिक प्रणाली असल्याने आरटीओतील कामकाजाला गती येईल, असे सांगितले जात असताना या संगणक प्रणालीमध्ये विविध प्रकारच्या तांत्रिक अडचणी असल्याचे निदर्शनास येतआहे.

नव्या संगणकप्रणालीचा वेग अत्यंत कमी असल्याने कामांसाठी नागरिकांचा खोळंबा होतो आहे. दिल्लीत वाहनांच्या वयाचा निकष वेगळा आहे. तो पुण्यात लागू होत नाही. कर किंवा काही कामाकरिता प्रणालीमध्ये वाहनाचे वय टाकल्यास ते दिल्लीच्या निकषानुसारच स्वीकारले जाते. याबाबत नेमके काय करायचे, याचे तांत्रिक ज्ञान कर्मचाऱ्यांना नाही. कोणतीही समस्या निर्माण झाल्यास अधिकारी कर्मचाऱ्यांना थेट दिल्लीत संपर्क साधून समस्या सोडवून घ्यावी लागते. या सर्व गोंधळाच्या वातावरणात आरटीओ कार्यालयात कामे करून घेण्यासाठी येणाऱ्या नागरिकांचे मात्र हाल होत आहेत. आरटीओ कार्यालयातील या गोंधळाबाबत महाराष्ट्र राज्य माल व प्रवासी वाहतूकदार संघाने तीव्र संताप व्यक्त केला आहे. नव्या संगणकप्रणालीतील अडचणींमुळे नागरिक व वाहतूकदारांचा वेळ वाया जातो आहे. त्यामुळे कामकाज सुरळीत होईपर्यंत पुणे आरटीओ कार्यालयात अनुभवी तंत्रज्ञाची नेमणूक करावी, अशी मागणी संघाने नॅशनल इन्फॉमॅटिक सेंटरकडे (एनआयसी) केली आहे. मागणी मान्य न झाल्यास आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही संघाचे अध्यक्ष बाबा शिंदे यांनी दिला आहे.

प्रणालीत तांत्रिक अडथळे; नागरिकांचा खोळंबा

नव्या संगणकप्रणालीला आम्ही विरोध करीत नाही. मात्र, या प्रणालीमध्ये अडचणी आहेत. त्या दूर झाल्या पाहिजेत. त्यासाठी सक्षम तंत्रज्ञ नेमणे गरजेचे आहे. पुणे आरटीओ कार्यालयाच्या कामकाजाचा व्याप मोठा आहे. त्यामुळे अशी नवी प्रणाली सुरुवातीला प्रायोगिक तत्त्वावर छोटय़ा कार्यालयात यशस्वी करून नंतर ती मोठय़ा कार्यालयांमध्ये वापरणे गरजेचे होते.

बाबा शिंदे, अध्यक्ष, राज्य माल व प्रवासी वाहतूक संघ