९७ टक्के रकमेचा भरणा ऑनलाइन; रोखपालांची संख्या दहावरून तीनवर

प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून एकूण १७ प्रकारच्या सेवा ऑनलाइन यंत्रणेमार्फत देण्यात येत असून शुल्काचा भरणाही ऑनलाइन पद्धतीने होत असल्याने सध्या आरटीओतून रोकड जवळपास हद्दपार झाली आहे. सद्यस्थितीत नागरिकांकडून सुमारे ९७ टक्क्य़ांहून अधिक रकमेचा भरणा ऑनलाइनद्वारे करण्यात येत आहे. या प्रकारामुळे आरटीओतील रोखपालांची संख्या दहावरून तीन करण्यात आली असून, इतरांना दुसऱ्या कामाची जबाबदारी देण्यात आली आहे.

नोव्हेंबर २०१७ पासून आरटीओ कार्यालयातील वाहनांसंबंधी सर्व प्रकारच्या कामकाजासाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करणे आणि शुल्क भरण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. परिणामी आरटीओमधील नागरिकांची गर्दी कमी झाली असून, कार्यालयात जमा होणाऱ्या रोख रकमेमध्ये कमालीची घट झाली आहे. नोव्हेंबर २०१७ पूर्वी पुणे आरटीओमध्ये दररोज सुमारे चार हजार पावत्या तयार केल्या जात होत्या. त्या माध्यमातून ५० लाखांच्या आसपास रक्कम जमा होत होती. त्यासाठी कार्यालयामध्ये आठ ते दहा रोखपाल कार्यरत होते. ऑनलाइन प्रक्रिया सुरू झाल्यानंतर सद्यस्थितीत पावत्यांची संख्या तीनशे ते चारशेवर आली आहे. दररोजच्या रोख रकमेचे प्रमाणही पाच ते सात लाखांवर आले आहे. सध्या केवळ तीन रोखपाल हे काम सांभाळतात. उर्वरित रोखपालांवर आता इतर कामांची जबाबदारी देणे शक्य झाले.

जानेवारी ते मार्च २०१८ या तीन महिन्यांच्या कालावधीत नवीन वाहन नोंदणी आणि वाहनसंबंधी कामासाठी आरटीओकडे एकूण २८३.०६ कोटी रुपयांचा महसूल जमा झाला. त्यापैकी ९६.२८ टक्के म्हणजे २७२.५४ कोटी महसूल ऑनलाइन पद्धतीने जमा झाला. याच कालावधीत वाहन परवाना विभागाच्या कामकाजासंबंधी ५.३५ कोटींचा महसूल जमा झाला. त्यातील  ९७.५६ टक्के म्हणजेच ५.२२ कोटी रुपये ऑनलाइन पद्धतीने जमा झाले.

कागदांच्या संख्येत प्रतिदिन तीन हजारांची घट

आरटीओ कार्यालयातील विविध सेवा ऑनलाइन केल्यामुळे अनेक गोष्टींबाबत सकारात्मक परिणाम दिसून येत आहे. पुणे कार्यालयाला दररोज लागत असलेल्या कागदांच्या संख्येत तब्बल तीन हजारांनी घट झाली आहे. त्यामुळे वर्षभरात सुमारे आठ ते नऊ लाखाच्या संख्येत कागद वाचू शकणार आहे. रोख रकमेचे प्रमाण कमी झाल्याने रक्कम हाताळण्याचा धोकाही कमी झाला आहे. त्याचबरोबरच यंत्रणा आणि मनुष्यबळाबाबतही बचत होऊ लागली आहे.

ऑनलाइन यंत्रणेतून अर्ज करणे आणि शुल्काचा भरणा करण्याबाबत नागरिकांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे.कोणत्याही रांगेत उभे न राहता कर भरण्याची सुविधा २४ तास उपलब्ध झाली आहे. त्यामुळे भरणाही वाढला आहे. आता केवळ तीन ते चार टक्के रक्कमच रोख स्वरूपात येते. त्यामुळे रोखपालांवरील कामाचा ताणही कमी झाला आहे.

बाबासाहेब आजरी, प्रादेशिक परिवहन अधिकारी