व्यापारी पेठांमध्ये वर्दळ सुरू

पुणे : निर्बंध शिथिल झाल्यानंतर व्यापारी पेठेतील दुकाने उघडण्यात आली असून हळूहळू व्यापारी पेठेतील व्यवहार पूर्वपदावर येत आहेत. व्यापारी पेठांमधील दुकानांमध्ये सोमवारी खरेदीसाठी गर्दी झाल्याचे पाहायला मिळाले. मात्र, शहर तसेच उपनगरातील प्रमुख रस्त्यांवर मलनिस्सारण वाहिन्यांचे काम सुरू असल्याने मोठय़ा प्रमाणावर वाहतूक कोंडी होत होती.

व्यापारी पेठांमधील दुकाने सोमवारपासून (७ जून) दुपारी चार वाजेपर्यंत खुली ठेवण्यास मुभा देण्यात आली आहे. यापूर्वी शहरातील दुकाने दोन वाजेपर्यंत खुली ठेवण्याची मुभा देण्यात आली होती. शहरातील करोनाबाधितांची संख्या कमी होत असल्याने प्रशासनाकडून टप्प्याटप्प्याने निर्बंध शिथिल करण्यास सुरूवात झाली असून त्याचा परिणाम व्यापारी पेठांमधील व्यवहारांवर झाला आहे. निर्बंध शिथिल झाल्यानंतर खरेदीसाठी गर्दी वाढली आहे. शहर तसेच उपनगरातील सर्व व्यापारी दुकानांमध्ये ग्राहकांची गर्दी होत आहे. पावसाळा सुरू झाल्याने रेनकोट, छत्री खरेदीसाठी गर्दी होत आहे. बोहरी आळीतील हार्डवेअर दुकाने, बुधवार पेठेतील इलेक्ट्रिक मार्केट, लक्ष्मी रस्त्यावरील वस्त्रदालने तसेच सराफी पेढय़ांमध्ये ग्राहकांची गर्दी होत आहे.

कोथरूड, कर्वेनगर, वारजे, सिंहगड रस्ता, सहकारनगर, धनकवडी तसेच हडपसर भागासह उपनगरातील व्यापारी पेठांमधील व्यवहार हळूहळू पूर्वपदावर येत आहेत. मध्यभागातील लक्ष्मी रस्ता, बाजीराव रस्ता, कुमठेकर रस्ता, केळकर रस्ता, शास्त्री, टिळक रस्त्यासह उपनगरातील अनेक रस्त्यांवर खोदाईची कामे सुरू असल्याने कोंडी होत आहे. धुराळ्यामुळे खरेदीदार तसेच व्यापाऱ्यांना त्रास होत आहे.

नियमावलीचे पालन करून व्यवहार

निर्बंध शिथिल झाले असले तरी व्यापारी पेठांमधील दुकानदारांनी खरेदीदारांची गर्दी न होण्यासाठी काळजी घेणे गरजेचे आहे. दुकानात एकाचवेळी ग्राहकांना आत येण्यास परवानगी देऊ नये. गटागटाने ग्राहकांना दुकानात प्रवेश देण्यात यावा. जंतुनाशके, तापमापकाचा वापर करण्यात यावा तसेच दुकानांमध्ये नियमित र्निजतुकीकरण करण्यात यावे, अशा सूचना पुणे व्यापारी महासंघाने दिल्या आहेत. व्यापार करताना व्यापाऱ्यांनी नियमावलींचे पालन करण्यात यावे, असे आवाहन पुणे व्यापारी महासंघाचे अध्यक्ष फत्तेचंद रांका आणि सचिव महेंद्र पितळीया यांनी केले आहे.