टोलसाठी सरासरी पाच ते पंचवीस रुपये अधिक मोजावे लागणार

पुणे-सातारा आणि पुणे-सोलापूर या दोन्ही महामार्गावरील टोलच्या दरांमध्ये १ एप्रिलपासून वाढ होणार आहे. दोन्ही रस्त्यांवर वाहनांच्या प्रकारानुसार सरासरी पाच ते वीस रुपयांनी टोल वाढणार आहे. पुणे-सातारा रस्त्याच्या सहा पदरीकरणाचे काम अनेक वर्षे रखडले असतानाही या रस्त्यावर टोलवाढ होत असल्याबाबत तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे.

पुणे-सातारा मार्गावरील खेडशिवापूर आणि आणेवाडी त्याचप्रमाणे पुणे-सोलापूर रस्त्यावर पाटस आणि सर्डेवाडी या टोलनाक्यांवर आता वाहनधारकांना अतिरिक्त टोल भरावा लागणार आहे. छोटय़ा वाहनांसाठी सुमारे पाच रुपये, तर व्यावसायिक आणि मोठय़ा वाहनांसाठी दहा ते पंचवीस रुपयांपर्यंत टोलची वाढ करण्यात आली आहे. करारानुसार दर तीन वर्षांनी टोलच्या दरांमध्ये वाढ करण्यात येते त्यानुसार ही वाढ असल्याचे सांगण्यात आले.

पुणे-सातारा रस्त्याच्या टोलवाढीबाबच मात्र तीव्र भावना व्यक्त करण्यात येत आहेत. या रस्त्याच्या सहा पदरीकरणाचे अडीच वर्षांचे काम तब्बल साडेसात वर्षांपासून रखडले असतानाही शासनाकडून वेळोवेळी मुदतवाढीच्या पायघडय़ा टाकल्या जात आहेत. त्यातच आता  रिलायन्स इन्फास्ट्रक्चर कंपनीला टोलवाढीचे बक्षीस देण्यात आले आहे. यापूर्वी खुद्द केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी संबंधित ठेकेदाराला काळ्या यादीत टाकण्याबाबत भाष्य केले होते. मात्र, त्यानंतरही ‘रिलायन्स’ला अभय मिळाल्याचे वेळोवेळी स्पष्ट झाले. देहूरोड ते सातारा या सुमारे १४० किलोमीटर रस्त्याचे हे काम आहे. ते ऑक्टोबर २०१० मध्ये सुरू झाले होते. नियोजनानुसार हे काम मार्च २०१३ मध्ये पूर्ण होणे अपेक्षित होते. काम संथगतीने होत असल्याचे लक्षात येऊनही कंपनीच्या मागणीखातर वेळोवेळी मुदतवाढ देण्यात आली.