पुणे-सातारा रस्त्यावर कोंडीत, टोलनाक्यावर अडकणाऱ्यांची स्थिती

राष्ट्रीय महामार्ग क्रमांक चारचा भाग असलेल्या पुणे ते सातारा या टप्प्यातील अंतर १४० किलोमीटर. त्यामुळे आपण मोटारीने दोन ते अडीच तासांत हे अंतर पूर्ण करू असा समज असेल, तर तो साफ चुकीचा ठरेल. कारण, रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चरच्या खड्डय़ांची आणि कामाच्या रखडपट्टीच्या ‘मेहरबानी’मुळे हे अंतर कधी पूर्ण करता येईल, हे कुणीच सांगू शकणार नाही. खेड- शिवापूरच्या टोलनाक्यावर नेहमीच लांबच लांब रांगा असतात, तर काम सुरू असलेल्या भागातील खड्डेमय रस्त्यांवरही कधी पाच-सहा किलोमीटपर्यंत वाहनांच्या रांगा लागतात. त्यात अडकून पडणाऱ्यांसाठी टोलचे पैसे देऊनही ‘तोंड दाबून बुक्क्य़ांचा मार’ अशीच स्थिती सातत्याने होत असते.

सहापदरीकरणाचे काम नऊ वर्षे रखडवून रिलायन्सने आणि अडीच वर्षांच्या कामाला तब्बल साडेसहा वर्षांची मुदतवाढ देऊन केंद्र शासनाने पुणे-सातारा रस्त्याबाबत एक ‘विक्रम’च केला आहे. उड्डाण पुलांची कामे अपूर्ण असलेल्या भागासह इतर विविध ठिकाणी रस्त्यावर मोठमोठे खड्डे आहेत. त्यामुळे इंधन, पैसा, वेळ आदी सर्वाचा अपव्यय होत असताना या रस्त्यावरून जाणारे वाहनधारक, चालक, प्रवासी यांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागतो आहे. मात्र, त्याचे काही देणेघेणे नसल्याच्या आविर्भावात चोखपणे टोलवसुली केली जाते. हा टोल भरण्यासाठीही भल्या मोठय़ा रांगेत तिष्ठत थांबावे लागत असल्याचे सद्य:स्थिती आहे.

खेड-शिवापूर टोल नाक्यावर सातत्याने रांगा लागल्याचे चित्र दिसते. पुण्याच्या दिशेने पश्चिम महाराष्ट्रात किंवा कोकणात जाणाऱ्यांसाठी हा रस्ता महत्त्वाचा आहे. टोल नाक्यावरील नियोजनाच्या अभावामुळे या भागात रोजच कोंडीची स्थिती निर्माण होत असते. सुटीच्या दिवशी त्याची तीव्रता आणखी वाढते. खड्डय़ातून प्रवास करून आल्यानंतर किंवा खड्डेमय प्रवास करण्यासाठी दोन्ही बाजूने अनेकदा केवळ टोल भरण्यासाठी अर्धा ते एक तासाचा कालावधी लागतो. उड्डाण पुलांची कामे बंद किंवा सुरू असलेल्या भागातील सेवा रस्त्यांवर वरवे ते नरसापूर या भागात सातत्याने वाहतूक कोंडी झाल्याचे दिसून येते. वेळूफाटा, चेलाडी, किकवी आदी भागामध्ये अनेकदा वाहनांच्या पाच ते सहा किलोमीटपर्यंत रांगा लागलेल्या असतात. त्यात वाहनधारक, प्रवासी अडकून पडतात. काही वेळेला पुढील प्रवासाचे नियोजन चुकते. याबाबत सातत्याने तीव्र संताप व्यक्त केला जात असला, तरी त्याचे ठेकेदार किंवा शासनाला काहीही देणेघेणे नसल्याचे वास्तव आहे.

टोलनाक्यावर रुग्णवाहिकाही अडकते तेव्हा..

पुणे-सातारा या खड्डेमय रस्त्यावरील टोलधाडीचे केंद्र असलेल्या खेड-शिवापूर टोल नाक्यावरील नियोजनशून्य कारभाराचा नमुना सातत्याने समोर येतो आहे. टोल नाक्यावरील रांगांमध्ये सातत्याने अनेक जण अडकून पडतात. त्यात रुग्णवाहिकांचाही समावेश असतो. ‘लोकसत्ता’कडून या रस्त्याचा आढावा घेतला जात असताना टोल नाक्यावर संध्याकाळी एक रुग्णवाहिका वाहनांच्या रांगेत अडकून पडली. पुढील वाहनांना तिला मार्ग देण्याची इच्छा असतानाही ते शक्य नव्हते. दहा मिनिटे सायरन वाजविल्यानंतर हळूहळू एकेक वाहन आजूबाजूच्या मार्गिकेत जाऊ लागले. त्यानंतर काही वेळाने रुग्णवाहिकेला मार्ग मोकळा झाला. पण, अशा आपत्कालीन वाहनांसाठी टोल नाक्यावर राखीव मार्गिका नसल्याचा मुद्दाही त्यामुळे समोर आला.

सातत्याची वाहतूक कोंडी आणि खड्डेमय प्रवासामुळे पुणे-सातारा रस्त्याने प्रवास म्हणजे छळवाद असतो. या रस्त्याने प्रवास करूच नये असे वाटते. केवळ पर्याय नाही म्हणूनच प्रवास करावा लागतो. – स्वप्निल काळे, वाहनधारक