नृत्य आणि गायकीचा सहजसुंदर आविष्कार

तबला आणि पखवाजच्या साथीने रंगलेले सुफियाना गायकी अंगाचे संतूरवादन.. डोळ्यांत साठवून ठेवावा असा मंत्रमुग्ध करणारा नृत्याविष्कार.. विविध घराण्यांची बहारदार गायकी.. गायन-वादन आणि नृत्य अशा संगीताच्या परिपूर्ण आविष्काराने रसिक शनिवारी भारावले. सुफियाना बाजाच्या गायकी अंगाने सादर झालेल्या बहारदार संतूरवादनाला रसिकांनी उभे राहून टाळ्यांच्या गजरात मानवंदना दिली.

आर्य संगीत प्रसारक मंडळातर्फे आयोजित ६५ व्या सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवाच्या चौथ्या सत्राला किराणा आणि आग्रा घराण्याचे युवा गायक तुषार दत्त यांच्या गायनाने सुरुवात झाली. शनिवारच्या सत्राला सायंकाळपासून सुरू झालेली रसिकांची गर्दी ध्यानात घेऊन दैनंदिन तिकीट विक्री बंद करण्याचा निर्णय संयोजकांना घ्यावा लागला. त्याचप्रमाणे महर्षी शिंदे पुलावर ज्या रसिकांनी चारचाकी वाहने लावली असतील त्यांनी तेथून आपली वाहने दुसरीकडे नेऊन लावावीत, असे आवाहन करण्यात आले.

पं. भजन सोपोरी यांचे पुत्र आणि शिष्य अभय सोपोरी यांच्या संतूरवादनाची मैफल रसिकांसाठी ‘मर्मबंधातली ठेव’ ठरली. या महोत्सवाची महती जाणून घेत त्यांनी ‘भीम’ रागाची निवड केली. आलाप, जोड वादनानंतर ऋषी शंकर उपाध्याय यांच्या पखवाजवादनाच्या साथीने त्यांनी झालावादनात रंग भरले. नंतर उस्ताद अक्रम खाँ यांच्या तबलावादनाच्या साथीने गत आणि बंदिश सादर केली. रसिकांच्या आग्रहास्तव सादरीकरणासाठी कालावधी वाढवून दिल्यानंतर सोपोरी यांनी काश्मिरी लोकधून असलेला सुफियाना तराणा सादर करीत मैफलीची सांगता केली तेव्हा रसिकांनी उभे राहून टाळ्यांचा गजर करीत त्यांना मानवंदना दिली. स्वरभास्कर पं. भीमसेन जोशी यांचे शिष्य पं. उपेंद्र भट, प्रसिद्ध गायिका आरती अंकलीकर यांच्या गायनाच्या बहारदार गायन मैफली रसिकांनी अनुभवल्या. प्राची शहा यांच्या कथक नृत्याने रसिकांना खिळवून ठेवले. ज्येष्ठ गायिका पद्मा तळवलकर यांच्या मैफलीने शनिवारच्या सत्राची सांगता झाली.

महोत्सवात आज (वेळ सकाळी ११.४५)

  • महेश काळे (गायन)
  • पद्मा शंकर (व्हायोलिन)
  • सुधाकर चव्हाण (गायन)
  • राजन कुलकर्णी आणि सारंग कुलकर्णी (सरोद)
  • आनंद भाटे (गायन)
  • उस्ताद शुजात खाँ (सतार)
  • डॉ. प्रभा अत्रे (गायन)