सत्ताधारी भाजपकडून सत्तेचा गैरवापर होत असल्यामुळे आघाडीतील अनेक नेत्यांचे पक्षांतर होत आहे, अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी सत्ताधारी भाजप आणि सेनेवर त्यांनी टीका केली. तसेच जे पक्षातून गेलेत त्यांच्या किंवा त्याबद्दल काही चिंता वाटत नसल्याचे त्यांनी सांगितले. पुण्यात एका कार्यक्रमासाठी शरद पवार आले होते. त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला आणि अनेक चालू घडामोडींवर आपले मत मांडले.

यावेळी शरद पवार म्हणाले की, मागील काही महिन्यात आघाडीमधील काही नेते मंडळी सत्ताधारी भाजप आणि सेनेत जाताना दिसत आहेत. अशीच परिस्थिती १९८० सालीदेखील झाली होती. ती परिस्थिती आणि आताची परिस्थिती जवळपास सारखीच आहे. त्यावेळी जे सत्ताधारी पक्षात गेले होते, त्या सर्वांना पराभवाचा सामना करावा लागला होता आणि आम्ही नव्याने तसेच ताकदीने पुन्हा उभा राहिलो होता. आतादेखील त्याच इतिहासाची पुनरावृत्ती होऊ शकते, असे ते म्हणाले.

“यंदाच्या विधानसभा निवडणुकीत नव्या चेहऱ्यांना अधिक संधी दिली जाणार आहे. सध्या आघाडीमध्ये ज्या पक्षांतरच्या घटना घडत आहेत, त्यात सत्ताधारी भाजप-शिवसेनेकडून सत्तेचा गैरवापर होत आहे. आघाडीतील काही नेत्यांना ‘तुमची ईडी आणि अन्य काही विभागामार्फत चौकशी लावू’, असे सांगण्यात येत असल्याचे ऐकण्यात आले आहे. अशा प्रकाराच्या दबाव तंत्रामुळे आघाडी मधील नेत्यांना भाजप आणि सेना ओढून घेत आहे. अशाप्रकारे सत्तेचा गैरवापर केल्याचे मी आजवर कधीही पाहिलेले नाही, असे त्यांनी नमूद केले.

“कर्नाटकमध्ये भाजपने सत्तेचा गैरवापर करूनच सत्ता मिळविली आहे. हा सर्व प्रकार तेथील आणि देशभरातील जनतेने पाहिला आहे”, असेही त्यांनी निदर्शनास आणून दिले.