तापमानाचा हंगामातील उच्चांक; आणखी वाढीचा अंदाज

पुणे : राज्यभरात उष्णतेची तीव्र लाट असतानाच पुणे शहर आणि परिसरातील कमाल तापमानाच्या पाऱ्याने शुक्रवारी चाळिशी ओलांडली. शहरात या हंगामातील उच्चांकी ४०.२ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली. शहरातील कमाल तापमानात आणखी वाढ होण्याची शक्यता असल्याचा अंदाज पुणे वेधशाळेने व्यक्त केला आहे. त्यामुळे उन्हाचा चटका वाढत जाणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

पुणे शहर आणि परिसरात मागील आठवडय़ापासून तीव्र उकाडा जाणवत आहे. मागील आठवडय़ात हंगामातील उच्चांकी ३९.८ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली होती. त्यानंतर दोन ते तीन दिवसांपासून कमाल तापमानात काहीशी घट झाली होती. मात्र, तापमान पुन्हा वाढणार असल्याचा अंदाज पुणे वेधशाळेकडून देण्यात आला होता. त्यानुसार शुक्रवारी कमाल तापमान ४०.२ अंशांवर पोहोचले. शुक्रवारी सकाळपासूनच उन्हाच्या झळा जाणवत होत्या. चटके बसणारे ऊन असल्याने दुपारी अनेकांनी घराबाहेर पडणे टाळले. त्यामुळे रस्त्यावर दुपारी रहदारीही कमी झाली होती.

कमाल तापमानासह किमान तापमानातही वाढ झाली. १७ ते १८ अंशांवर असलेले किमान तापमान शुक्रवारी थेट २०.२ अंशांवर पोहोचले. त्यामुळे पहाटे काही प्रमाणात जाणवणारी थंडीही गायब होण्याची शक्यता आहे. पुढील दोन ते तीन दिवस शहर आणि परिसरातील हवामान कोरडे राहणार असल्याने तापमानाचा पारा आणखी वाढू शकतो, असा अंदाज वेधशाळेकडून देण्यात आला आहे.